परळीत शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन उत्साहात; अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण




परळी वैजनाथ | प्रतिनिधी

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार, दि. १९ जून रोजी परळी वैजनाथ येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात उत्साहपूर्ण वातावरणात भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी "जय भवानी, जय शिवाजी", "शिवसेना जिंदाबाद", "हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो", तसेच "उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं" अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. घोषणांच्या गजरात संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. भगव्या ध्वजाखाली एकत्र आलेल्या शिवसैनिकांनी शिवसेनेच्या विचारांशी निष्ठा राखण्याचा आणि संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी मार्गदर्शन करताना अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांनी सर्व शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी मुंबई येथे शिवसेनेची स्थापना केली. "८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण" हा पक्षाचा मूलभूत विचार असून हा विचार प्रत्येक शिवसैनिकाने जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले पाहिजे. समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणे हीच खरी शिवसेनेची परंपरा असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी अधिक जोमाने काम करून संघटना मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर, युवासेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. अतुल दुबे, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे उपजिल्हाप्रमुख सतीश जगताप, शिवसेना तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, माजी उपशहरप्रमुख संजय कुकडे, किशन बुंदेले,युवासेना माजी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, विद्यार्थी सेनेचे माजी उपतालुकाप्रमुख मनीष जोशी, छत्रपती शिवाजीनगर विभाग प्रमुख सुरेश परदेशी, पत्रकार बालाजी ढगे, योगेश जाधव, प्रकाश देवकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!