सीसीटीव्हीत थार गाडी कैद, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी
पाटोदा बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन महिलेचे दागिने लंपास; अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल
पाटोदा: बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन एका महिला प्रवाशाचे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा तालुक्यातील डोमरी येथील रहिवासी माया अशोक भोंडवे या १८ जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पाटोदा बसस्थानकावरून बसमध्ये चढत होत्या. यावेळी बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने भोंडवे यांच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि २० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल शिताफीने लांबवला. बसमध्ये बसल्यानंतर भोंडवे यांच्या गळ्यातील दागिने गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु दागिने मिळून आले नाहीत. अखेर त्यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस हवालदार उबाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा