मानपान आणि वाहनासाठी छळ.....
स्कोर्पिओ गाडीसाठी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ: परळीत ६ जणांवर गुन्हा
परळी वैजनाथ: प्रतिनिधी....
लग्नात योग्य मानपान केला नाही आणि माहेरहून स्कोर्पिओ गाडी साठी १० लाख रुपये आणले नाही म्हणून एका ३० वर्षीय विवाहितेचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या ६ जणांविरुद्ध छळ आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम बालाजी आडे (वय ३०, मूळ रा. कोठाळा वंजारवाडी, ता. सोनपेठ, जि. परभणी, सध्या रा. मालेवाडी, ता. परळी) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती बालाजी मोतीराम आडे, सासू शेषाबाई मोतीराम आडे, सासरे मोतीराम आडे, नणंद शांता बालु जाधव, नंदावा बालु शंकर जाधव आणि सवत मनिषा बालाजी आडे (सर्व रा. वंजारवाडी, ता. सोनपेठ, जि. परभणी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मानपान आणि वाहनासाठी छळ
लग्नात मुलीच्या आई-वडिलांनी सासरच्या लोकांचा व्यवस्थित मानपान केला नाही, या कारणावरून आरोपींनी संगनमत करून विवाहितेला त्रास देण्यास सुरुवात केली होती. सासरच्या मंडळींनी माहेरहून स्कोर्पिओ गाडी खरेदी करण्यासाठी चक्क १० लाख रुपयांची मागणी केली. या पैशांसाठी गेल्या एक वर्षापासून ते ५ जून २०२६ दरम्यान विवाहितेला सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता.
लाथा-बुक्क्यांनी मारहाण आणि धमकी
पैसे आणण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे आरोपींनी विवाहितेला अत्यंत अमानुषपणे शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर, जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा छळ सुरूच ठेवला. अखेर या त्रासाला कंटाळून विवाहितेने पोलिसात धाव घेतली. परळी ग्रामीण पोलिसांनी ३० जून २०२६ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टोले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा