परळीचा लौकिक वाढेल - ना. पंकजा मुंडे

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली परळीच्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे १४ ऑगस्टला भूमीपूजन
जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी व मान्यवर राहणार उपस्थित

परळी वैजनाथ दि. ०९ ---
शहराच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या आणि ५६५ कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन येत्या १४ ऑगस्ट रोजी उप मुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना.सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आणि पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाची प्रशासनाकडून सध्या तयारी सुरू झाली आहे.

    शुक्रवार १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता ग्रामीण पोलीस ठाण्याजवळ असलेल्या टेकडीवरील मैदानात हा भूमीपूजन कार्यक्रम पार पडणार आहे.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार १४ ऑगस्टला तर ना. पंकजा मुंडे १३ तारखेला परळीत येणार आहेत. कार्यक्रमास आ. धनंजय मुंडे यांच्यासह जिल्हयातील सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 

ना. पंकजा मुंडेंचा सिंहाचा वाटा
--------
परळीला पशुवैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यात ना. पंकजा मुंडे यांचा सिंहाचा वाटा आहे. या खात्याची मंत्री झाल्यानंतर त्यांनी परळी येथे व त्यावेळचे उप मुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या आग्रहामुळे बारामती येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळीच्या महाविद्यालया साठी ५६४ कोटी ५८ लाख इतका निधी देखील मंजूर केला. आता १४ तारखेला याचे भूमीपूजन होत आहे.

४१ हेक्टर जमीनीवर उभे राहणार महाविद्यालय
--------
महाविद्यालय उभारणीसाठी जमीन संपादनाची सर्व कार्यवाही पूर्ण झालेली आहे.परळी तालुक्यातील मौजे लोणी येथील गट क्र. ०७ मधील ८ हेक्टर ८० आर व मौजे परळी येथील स.नं. ४७८ मधील २० हेक्टर आणि अतिरिक्त १३ हेक्टर अशी एकूण ४१ हेक्टर ८० आर जमीन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि पशुधन प्रक्षेत्र उभारणीसाठी प्रदान करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन मान्यता महसूल व वन विभागाने दिली आहे.
परळीचा लौकिक वाढेल - ना. पंकजा मुंडे
---------------------
परळीत होणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून मराठवाड्यात एक मोठे शैक्षणिक केंद्र उभारले जाणार असून स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी नवे दालन उघडणार आहे. यामुळे पशुसंवर्धन संशोधनासाठी स्वतंत्र प्रक्षेत्र निर्माण होईल. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना तसेच शेतकरी व पशुपालकांसाठी तांत्रिक व आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानाची जोड असलेले हे महाविद्यालय परळी तालुक्याचे लौकिक वाढवेल. सोबतच राज्याच्या पशूवैद्यकीय क्षेत्राला देखील यामुळे नवी उभारी मिळेल असं ना. पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार