श्री गणेश मंडळाच्या रक्तगट व आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
४७ जणांची रक्तगट तपासणी; ३० जणांची बीपी तर २५ जणांची शुगर तपासणी
परळी वैजनाथ (संजय क्षिरसागर) - येथील हनुमान मंदिर, सुभाष चौक परिसरातील श्री गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तगट व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
मंगळवार, दि.२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात ४७ नागरिकांची रक्तगट तपासणी, ३० जणांची रक्तदाबाची (बीपी) तपासणी, तर २५ जणांची रक्तातील साखरेची (शुगर) तपासणी करण्यात आली. नागरिकांना आपल्या आरोग्याची प्राथमिक माहिती एकाच ठिकाणी मिळाल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिबिराचे उद्घाटन परळी शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रज्ञा ढाकणे तसेच समाजसेवक मुन्ना भैया बागवाले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमातून जपलेली सेवाभावाची परंपरा कौतुकास्पद असल्याचे सांगत, अशा आरोग्यविषयक उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या आरोग्य शिबिरासाठी आरोग्यसेवक संतोष वाघमारे, आरोग्यसेविका पौर्णिमा शिंदे, सुजाता चव्हाण, दीपाली अडसूळे, परिचारक शरीफ शेख, आशा वर्कर सारिका मुंडे व मोहिनी सोहरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
श्री गणेश मंडळाच्या कार्यकारिणीने गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक कार्यक्रम न राबविता सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांनाही प्राधान्य देत समाजोपयोगी कार्याचा आदर्श निर्माण केला आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे मंडळाच्या सामाजिक कार्याला आणखी बळ मिळाले आहे.
शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या सर्व नागरिकांचे, उद्घाटक मान्यवरांचे, आरोग्य विभागातील सर्व सहकाऱ्यांचे तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे श्री गणेश मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा