दुष्काळसदृश परिस्थितीबाबत मदतीचा आदेश उद्याच काढणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वाशिम जिल्ह्यातील म्हसला, ता. कारंजा, मोहगव्हाण, ता. मंगरुळपीर आणि जऊळका, ता. मालेगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली.

वाशिम जिल्ह्यातील म्हसला, ता. कारंजा येथील शेतकरी देविदास काळे, मोहगव्हाण, ता. मंगरुळपीर येथील शेतकरी अनिल भगरे आणि अब्दुल नईम शेख रहीम, तसेच जऊळका, ता. मालेगाव येथील शेतकरी संतोष डुंबळे यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी संतोष यांच्या आई शकुंतलाबाई डुंबळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर झालेल्या नुकसानीसंदर्भात माहिती दिली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे स्पष्ट केले.

अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांना अवर्षणाची झळ पोहोचली असून सोयाबीन, तूर आदी पिके संकटात आली आहेत. या संकटाच्या काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांनी कोणतीही चिंता करू नये. शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत प्राधान्याने देण्यात येईल, यासाठी दुष्काळ संहितेतील ट्रिगर-1 नुसार मदतीचा आदेश उद्याच काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. केंद्र सरकारच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य सरकारकडून मदत तातडीने दिली जाईल. तसेच केंद्र सरकारच्या मदतीसाठी आवश्यक पंचनामे व इतर प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. मदतीतून काही भाग वगळला गेला असल्यास पुढील प्रक्रियेत त्याचा समावेश करण्याबाबतही कार्यवाही केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

येत्या काळातील चाराटंचाई आणि पाणीटंचाई लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. गरजू कुटुंबांना अन्नधान्याची मदत, तसेच शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी थेट मदत करण्याचे नियोजन आहे. रब्बी हंगामात ज्या भागात पाणी उपलब्ध आहे, तेथे पिके घेता येतील का, याची तपासणी करून शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी आवश्यक मदत दिली जाईल. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात येणार असून, आटलेल्या जलसाठ्यांमधील गाळ काढणे, जलतारा स्ट्रक्चर उभारणे आणि दुरुस्ती आवश्यक असलेल्या तलावांची दुरुस्ती करण्याची कामे हाती घेतली जातील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

सर्वदूर पिकांची परिस्थिती गंभीर असल्याने राज्य सरकारने मदतीचे धोरण आखले आहे. ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात येईल. राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असून, कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी नियमानुसार कर्जपुरवठा करणे आवश्यक आहे. तसेच शेतमालाची शासकीय दराने खरेदी करण्यात येणार असून, त्यासाठी लवकरच नोंदणी सुरू केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

यावेळी खासदार संजय देशमुख, खासदार अनुप धोत्रे, आमदार बाबूसिंह महाराज राठोड, आमदार सई डहाके, आमदार राजेश बकाने, आमदार श्याम खोडे, आमदार रणधीर सावरकर, आमदार भावना गवळी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!