पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्राधान्य देण्याचे आवाहन....
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या सूचनेवरून परळीत पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्मिती; भाजपा नगरसेवकांचे श्रमदान
परळी वैजनाथ: प्रतिनिधी
पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडे यांच्या सूचनेनुसार यंदाच्या गणेशोत्सवात जलप्रदूषण रोखण्यासाठी परळी नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्था करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरातील हरिहर तीर्थासमोर गणेश विसर्जनाची कृत्रिम तलाव निर्मिती सुविधा करण्यात आली आहे. भाजपा नगरसेवकांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून परिसरात स्वच्छता व तयारीसाठी स्वतः श्रमदान केले.
यंदा पाऊस कमी असल्याने नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. धार्मिक भावना जपत नागरिकांनी नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या या पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा नगरसेवकांच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये महिला बालकल्याण सभापती सौ. अंजलीताई माळी लोखंडे, अश्विन मोगरकर, राहुल केंद्रे, केशव नागरगोजे आणि अश्विनकुमार आघाव यांचा समावेश होता. या पाहणीदरम्यान विसर्जनाची व्यवस्था, नागरिकांची सुरक्षा आणि पाण्याची उपलब्धता या बाबींचा आढावा घेण्यात आला.यावेळी उपमुख्याधिकारी संतोष रोडे, अंगद माळी आणि नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
“पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवात बाप्पांचे विसर्जन पर्यावरण पूरक व्हावे अश्या सूचना दिल्या आहेत. गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि आनंदाचा उत्सव आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचे रक्षण करणे हीदेखील आपली सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्राधान्य द्यावे आणि नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या विसर्जन व्यवस्थेचा वापर करावा,” असे आवाहन भाजप शहर सरचिटणीस अश्विन मोगरकर यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा