महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी घेतला लाभ..
श्री गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात २५ युवकांचे रक्तदान
परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) - येथील हनुमान मंदिर, सुभाष चौक परिसरातील श्री गणेश मंडळाच्या वतीने रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी सामाजिक बांधिलकी व सेवाभाव जपत रक्तदान शिबिर तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २५ युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान—रक्तदान करून जीवनदान द्या” या संदेशाने प्रेरित होऊन युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
रक्तदान शिबिरानंतर दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांसह शहरातील अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
रक्तदान हे केवळ रक्तदान नसून गरजू रुग्णाच्या जीवनासाठी मोलाचे योगदान देण्याचे कार्य आहे. त्यामुळे युवकांसह नागरिकांनी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते.
रक्तदान शिबिर व महाप्रसादाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे रक्तदाते, भाविक, नागरिक व सर्व कार्यकर्ते यांचे श्री गणेश मंडळ, हनुमान मंदिर, सुभाष चौक, परळी वैजनाथ यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा