विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?
कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 14 गोवंशीय जनावरांची सुटका
गेवराई पोलिसांची कारवाई; 1 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त
गेवराई : प्रतिनिधी
आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोवंश कत्तलीविरोधात गेवराई पोलिसांनी शनिवारी (दि.23) धडक कारवाई करत कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 14 गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत अंदाजे 1 लाख 60 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यातील अवैध गोवंश कत्तलीस आळा घालण्यासाठी कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गेवराईचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. साठेनगर येथील सलमान मोहम्मद कुरेशी (वय 25) याने आपल्या ताब्यातील जागेत गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या डांबून ठेवल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे गेवराई पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. छाप्यात आरोपीच्या मालकीच्या जागेत लहान-मोठी 14 गोवंशीय जनावरे दाटीवाटीने ठेवण्यात आल्याचे आढळून आले. तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचेही निदर्शनास आले.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत अंदाजे 1 लाख 60 हजार 500 रुपये किमतीची 14 गोवंशीय जनावरे ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. पुढील संगोपन व संरक्षणासाठी सर्व जनावरे गोशाळेत दाखल करण्यात आली आहेत. आरोपी सलमान मोहम्मद कुरेशी याच्याविरुद्ध विविध कायदेशीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ, पोलीस उपनिरीक्षक राम खोत, पोलीस हवालदार कल्याण राठोड, संजय सोनवणे, महिला पोलीस हवालदार रेशमा पौळे, पोलीस नाईक अमोल सोनवणे तसेच पोलीस कॉन्स्टेबल गोरक्ष डोके, धिरज खांडेकर, भरत शेळके व रामराजे काकडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा