मोहा येथील घटनेने बीडमध्ये हळहळ
बांधकामावरून पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू
बीड प्रतिनिधी —
मोहा ता. परळी येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून खाली पडल्याने एका २८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमोल विलास माने (वय २८, रा. गोविंद नगर, धानोरा रोड, बीड) असे मृत युवकाचे नाव आहे.या दुर्दैवी घटनेची सिरसाळा पोलीस ठाण्यात बीएनएसएसच्या कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्युची नोंद करण्यात आली असुन पोलीस हवालदार विष्णु नामदेव शेंडगे अधिक तपास करत आहेत .
याबाबत मयताची आई निर्मला विलास माने यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ मे २०२६ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास कंत्राटदार मुस्ताक कादरी व कामगार अक्षय गायकवाड आणि शेख अजीन हे त्यांच्या घरी आले. त्यांनी अमोल हा मोहा येथील बांधकाम साईटवर काम करत असताना दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून खाली पडल्याचे सांगितले. त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने शासकीय रुग्णालय, अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
मात्र नंतर नातेवाईकांकडून अमोलचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजले. त्यानंतर सिरसाळा पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली. अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.त्यानंतर अंकुश नगर, बीड येथील स्मशानभूमीत अमोल माने यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा