खळबळजनक :नदीपात्रात आढळला महिलेचा सांगाडा 

          माजलगाव तालुक्यातील डुब्बा मांजरा गावालगत वाहणाऱ्या सिंदफणा नदीच्या पात्रात एका महिलेचा सांगाडा आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील काही नागरिक नदीकाठी सरपण गोळा करण्यासाठी गेले असता त्यांना झाडाझुडपांमध्ये मानवी सांगाड्यासारखी वस्तू दिसून आली. संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता तो मानवी सांगाडा असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती गावात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली.

घटनेची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून सांगाडा ताब्यात घेतला. प्राथमिक तपासात सांगाड्यावर काळ्या रंगाचा ब्लाउज आढळून आल्याने तो महिलेचा असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, मृतदेहाला सुमारे तीन ते चार महिने उलटले असावेत, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. काही दिवसांपासून नदीतील पाण्याची पातळी घटल्याने हा सांगाडा उघडकीस आला असावा, असा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. तसेच हा मृतदेह पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत आला असावा किंवा झाडाझुडपांमध्ये अडकून राहिला असावा, अशीही चर्चा परिसरात सुरू आहे.

पोलिसांनी सांगाड्याचे काही नमुने पुढील तपासणीसाठी अंबेजोगाई आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळांकडे पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. तपासणी अहवालानंतर मृत महिलेची ओळख, मृत्यूचे कारण आणि घटनेमागील नेमके सत्य स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पोलीस देवकते, PSI राठोड तसेच पोलीस अंमलदार विष्णू मेत्रे यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!