परळीच्या नकाशावर आणखी एक ‘मोठे केंद्र’...
ऐतिहासिक झेप: पंकजाताईंच्या दूरदृष्टीतून परळीत साकारतेय पशुसंवर्धनाचे ‘पॉवर सेंटर’!
लोकनेत्याच्या संस्कारातून वैद्यनाथाच्या भूमीत निर्माण होणार पशुसंवर्धनाची नवी गाथा!
परळीच्या विकासात्मक जडणघडणीच्या इतिहासात आणखी एक मोठे पान लिहिले जात आहे. ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची धार्मिक नगरी, ऊर्जा नगरी अशी ओळख असलेल्या परळीला आता पशुवैद्यकीय शिक्षण, संशोधन, उपचार आणि आधुनिक पशुसंवर्धनाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून नवी ओळख मिळणार आहे. परळीची लेक राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या दूरदृष्टीतून परळी येथे भव्य पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय संकुल उभारणीच्या दिशेने आज पायाभरणीचे निर्णायक पाऊल पडत आहे. हा एक इतिहास ठरणार आहे. हा केवळ एक कॉलेज प्रकल्प नाही; तर शेतकरी, पशुपालक, विद्यार्थी आणि संपूर्ण पशुसंवर्धन क्षेत्राच्या भविष्यात बदल घडविणारी मोठी पायाभूत गुंतवणूक ठरणार आहे.५६४ कोटींच्या या प्रकल्पाची भूमिपूजनाची ही कोनशिला परळीच्या विकासातील नवी झेप ठरणार आहे.
परळीची लेक राज्याची पशुसंवर्धन मंत्री झाल्याबरोबर एक मोठं आणि पिढ्यान् पिढ्या लक्षात राहील असं गिफ्ट परळीकरांना मिळालं. राज्य मंत्रिमंडळाने २५ फेब्रुवारी २०२५ रोजी परळीत नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली. या प्रकल्पासाठी सुमारे ५६४.५८ कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली.पंकजाताई मुंडे यांनी पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर परळीला आणि बारामतीला हे महत्त्वाचे संस्थात्मक केंद्र मिळाले. आपल्या परळीला मोठे प्रकल्प आणण्याची राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासनाला त्यासाठी कामाला लावण्याची क्षमता या दोन्हींचा परिणाम म्हणून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
४१ हेक्टर क्षेत्रात उभे राहणार भव्य संकुल!
---------------------
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी परळी तालुक्यातील मौजे लोणी येथील गट क्र. ०७ मधील ८ हेक्टर ८० आर व मौजे परळी येथील स.नं. ४७८ मधील २० हेक्टर आणि अतिरिक्त १३ हेक्टर अशी एकूण ४१ हेक्टर ८० आर जमीन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि पशुधन प्रक्षेत्र उभारणीसाठी प्रदान करण्यात आली आहे.
परळीतील जमीन महाविद्यालयीन संकुलासाठी, तर लोणी येथील जमीन पशुधन प्रक्षेत्रासाठी वापरण्याचे नियोजन आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना केवळ चार भिंतींच्या वर्गात पशुवैद्यकीय शिक्षण मिळणार नाही; तर प्रत्यक्ष पशुधन, पशुपालन, प्रजनन, पोषण आणि व्यवस्थापनाचा अनुभव घेता येणार आहे.
भविष्यात शेकडो पशुचिकित्सा तज्ज्ञ तयार होणार
---------------------
प्रस्तावित महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पशुवैद्यकीय पदवी शिक्षणाची संधी मिळणार आहे.आज पशुधन क्षेत्रात तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टरांची मोठी गरज आहे. या पार्श्वभूमीवर परळीतील महाविद्यालयातून दरवर्षी प्रशिक्षित पशुवैद्यकीय मनुष्यबळ तयार होणार आहे. बीडसह संपूर्ण मराठवाड्याच्या पशुधन अर्थव्यवस्थेला याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकतो.आज शेतकऱ्याच्या अर्थकारणात पशुधनाचा वाटा मोठा आहे. पण पशुधन आजारी पडले, तर अनेकदा योग्य वेळी तज्ज्ञ उपचार मिळणे हीच मोठी अडचण ठरते.याचं वास्तवाला उत्तर देणारे केंद्र परळीत आकाराला येणार आहे. हे एका पिढीचे शिक्षण नव्हे; पुढच्या अनेक पिढ्यांच्या पशुधन अर्थव्यवस्थेला बळ देणारी गुंतवणूक ठरणार आहे.
एकाच संकुलात संपूर्ण साखळी
---------------------
हे केवळ अध्यापनाचे केंद्र न राहता उपचार आणि निदान सुविधांनी युक्त पशुवैद्यकीय केंद्र म्हणून विकसित होणार आहे.मोठ्या व लहान जनावरांसाठी उपचार सुविधा, शस्त्रक्रिया, प्रयोगशाळा, क्ष-किरणासारख्या निदान सुविधा, औषध व्यवस्था आणि आवश्यक तांत्रिक मनुष्यबळामुळे परिसरातील पशुपालकांना आधुनिक पशुवैद्यकीय सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शेतकऱ्याच्या गोठ्यातील जनावरापासून विद्यार्थ्याच्या प्रयोगशाळेपर्यंत—एकाच संकुलात संपूर्ण साखळी यामाध्यमातून निर्माण होणार आहे.
संशोधनाला मोठी संधी
---------------------
पशुरोगांचे निदान, प्रतिबंध, पशुपोषण, प्रजनन, पशुवंशशास्त्र, पशुधन उत्पादन आणि आधुनिक पशुपालन यासारख्या विषयांमध्ये प्रयोगशाळा व संशोधनाच्या सुविधा विकसित होणार आहेत.यामुळे परळीतील हे केंद्र भविष्यात पशुधनाशी संबंधित संशोधन आणि तांत्रिक ज्ञानाचे महत्त्वाचे केंद्र बनण्याची क्षमता ठेवणारे होणार आहे.शिक्षण ,उपचार ,संशोधन, पशुधन प्रक्षेत्र ,आधुनिक तंत्रज्ञान ,शेतकरी मार्गदर्शन असे हे एकात्मिक पशुसंवर्धन केंद्र निर्माण होणार आहे.
रोजगाराच्या नव्या संधी
---------------------
या महाविद्यालया साठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची तरतूद करण्यात आली आहे. ९६ शिक्षक, १०४ नियमित शिक्षकेतर कर्मचारी, ७६ बाह्यस्रोत असे २७६ मनुष्यबळ लागणार आहे. यामध्ये प्राध्यापकांपासून सहाय्यक प्राध्यापकांपर्यंत, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांपासून प्रयोगशाळा व क्ष-किरण तंत्रज्ञांपर्यंत तसेच पशुधन प्रक्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. म्हणजेच महाविद्यालय सुरू झाल्यानंतर शिक्षणाबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.
पशुपालकांसाठी ज्ञानाचे ‘वन-स्टॉप सेंटर’
-------------------
दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन किंवा इतर पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, रोगप्रतिबंधक उपाय, पशुपोषण, प्रजनन आणि पशुधन व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन मिळू शकते. पशुधन निरोगी तर शेतकऱ्याची अर्थव्यवस्था मजबूत या सूत्राला प्रत्यक्ष बळ देणारी सुविधा म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे.पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी सांभाळताना पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना, पशुधन विमा योजना, पशुपालकांसाठी विविध योजना आणि परळीत पशुवैद्यकीय महाविद्यालय अशा माध्यमातून पशुसंवर्धन क्षेत्राला संस्थात्मक बळ देण्यावर भर दिला आहे. परळीतील हा प्रकल्प त्यांच्या कार्यकाळातील दृश्यमान आणि दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे.
परळीच्या नकाशावर आणखी एक ‘मोठे केंद्र’
---------------
परळीची ओळख वैद्यनाथ ज्योतिर्लिंगामुळे देशभर आहे. औष्णिक वीज प्रकल्पामुळे ऊर्जा क्षेत्रातही परळीचे महत्त्व आहे. आता त्यात पशुवैद्यकीय शिक्षण आणि पशुसंवर्धनाचे नवे केंद्र जोडले जाणार आहे. ४१ हेक्टरचा परिसर, कोट्यवधींची गुंतवणूक, पशुधन प्रक्षेत्र, प्रयोगशाळा, उपचार सुविधा आणि २७६ मनुष्यबळाची तरतूद हे चित्र केवळ एका महाविद्यालयाचे नाही. हे परळीच्या बदलत्या विकासाचे चित्र आहे.
परळीच्या भविष्यातील नवा अध्याय
--------------------
परळीला मोठ्या शैक्षणिक संस्था आणि आधुनिक सुविधा मिळाव्यात, या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना पशुवैद्यकीय महाविद्यालयामुळे एक मोठे यश मिळाले आहे.पंकजाताई मुंडे यांच्या दूरदृष्टीतून परळीच्या भूमीत उभे राहणारे हे पशुवैद्यकीय संकुल भविष्यात हजारो पशुपालकांना सेवा, शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षण आणि पशुसंवर्धन क्षेत्राला तज्ज्ञ मनुष्यबळ देणारे केंद्र ठरणार आहे. या निमित्ताने आज परळीच्या मातीत एक नवे स्वप्न आकार घेत आहे.
••••

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा