महावितरणचा मोठा निर्णय : खासगी, अनधिकृत व्यक्तींना वीज यंत्रणेवर काम करण्यास बंदी
डीपी, पोलवरील कामे, आकडे जोडणे, मीटर काढणे-बांधणे आता केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांकडूनच; नियम मोडल्यास कारवाई
परळी वैजनाथ : महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेवरील कामे अनधिकृत खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाकडून करून घेण्यास आता स्पष्टपणे प्रतिबंध करण्यात आला आहे. महावितरणच्या संचालक (संचालन) यांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.
वीज वितरण यंत्रणेची सुरक्षित देखभाल, दुरुस्ती तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र, काही ठिकाणी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून कामे पूर्ण करण्यासाठी खासगी किंवा अनधिकृत व्यक्तींचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
डीपीपासून मीटरपर्यंतची कामे अनधिकृत व्यक्तींना नाहीत
नव्या निर्देशांनुसार वीज वितरण यंत्रणेतील डीपीवरील कामे, विद्युत पोलवर चढून दुरुस्ती करणे, विद्युत वाहिनीवरील बिघाड दूर करणे, वीजपुरवठ्याशी संबंधित जोडणीची कामे, आकडे जोडणे, ग्राहकांचे मीटर काढणे अथवा बसवणे यासह वीज वितरण यंत्रणेवरील कोणतेही काम अनधिकृत व्यक्तींमार्फत करून घेता येणार नाही.
अशा कामांसाठी केवळ कंपनीने अधिकृत केलेल्या वीज कामगारांनाच परवानगी असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
अपघात झाल्यास जबाबदारीचा गंभीर प्रश्न
महावितरणने या निर्णयामागे वीज अपघातांची शक्यता आणि जीवित व मालमत्तेच्या सुरक्षिततेचा मुद्दा अधोरेखित केला आहे. अनधिकृत व्यक्तींकडून वीज यंत्रणेवर काम करून घेतल्यास संबंधित व्यक्तीला विद्युत अपघात होण्याबरोबरच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही धोका निर्माण होऊ शकतो. तसेच ग्राहकांच्या जीवितास आणि कंपनीच्या मालमत्तेसही धोका पोहोचू शकतो.
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या Central Electricity Authority (Measures relating to Safety and Electric Supply) Regulations, 2023 मधील तरतुदीनुसार केवळ अधिकृत व्यक्तीलाच वीज वितरण सेवेची कामे करण्याची पात्रता असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित
अनधिकृत मनुष्यबळाचा वापर करून काम करून घेतल्याचे आढळल्यास किंवा अशा प्रकारच्या गैरप्रकारामुळे अपघात अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास विभागीय स्तरावर चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई, प्रसंगी सेवासमाप्तीची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच क्षेत्रीय कार्यालयातील मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांनी आपल्या कार्यक्षेत्रात अनधिकृत मनुष्यबळाचा वापर होत नाही ना, याची वेळोवेळी तपासणी करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
वीज ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय
महावितरणच्या या परिपत्रकामुळे गावागावांत आणि शहरांमध्ये वीज वितरण यंत्रणेवर खासगी व्यक्तींकडून केली जाणारी अनधिकृत कामे थांबण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे डीपी, पोल, वीजवाहिन्या किंवा मीटरशी संबंधित कामांसाठी नागरिकांनी स्वतःहून अनधिकृत व्यक्तींना काम देऊ नये, तसेच अशा व्यक्तींमार्फत काम करून घेणे टाळावे, असा स्पष्ट संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा