अंबाजोगाई रोडवरील उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
आरोग्यासाठी चालणारे हात स्वच्छतेसाठी सरसावले; परळीतील टेकडीवर डॉक्टरांची स्वच्छता मोहीम
अंबाजोगाई रोडवरील उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश; बाटल्या अन् प्लास्टिकचा कचरा गोळा करून लावली विल्हेवाट
परळी वैजनाथ, दि. २७ सप्टेंबर : परळी परिसरात दररोज सकाळी आरोग्यासाठी टेकडीवर फिरायला जाणाऱ्या चौघांनी रविवारी परिसराच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. अंबाजोगाई रोडवरील टेकडी परिसरात पडलेल्या बाटल्या, प्लास्टिक आणि इतर कचऱ्याचे संकलन करून डॉ. गोपाळ झंवर, डॉ. तुषार पिंपळे, डॉ. विश्वास भायेकर आणि केंद्रे यांनी स्वच्छता मोहीम राबवली. गोळा केलेला कचरा गोण्यांमध्ये भरून डम्पिंग ग्राउंडवर नेण्यात आला.
परळी शहरातील अंबाजोगाई रोडलगतच्या डोंगर परिसरात हजारो नागरिक सकाळ-संध्याकाळ चालण्यासाठी आणि व्यायामासाठी येतात. नियमित फिरायला येणाऱ्या नागरिकांनी एकत्र येऊन उंच टेकडीवर ‘आरोग्यदायी हनुमान मंदिरा’ची स्थापना केली आहे. दर्शनासोबतच टेकडी चढण्याचा व्यायाम व्हावा, हा त्यामागील उद्देश आहे. परिसरात चांगली पायवाट, दिशादर्शक फलक, बसण्यासाठी बाके आणि वृक्षारोपण असे उपक्रमही नागरिकांच्या सहभागातून राबवले जातात.
मात्र, काही जण या परिसरात पार्ट्यांसाठी येऊन कचरा तिथेच टाकतात. खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे, प्लास्टिकच्या बाटल्यांसोबत दारूच्या बाटल्याही परिसरात पडत असल्याने या निसर्गरम्य ठिकाणाच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ही बाब नियमित फिरायला जाणाऱ्या डॉ. झंवर, डॉ. पिंपळे, डॉ. भायेकर आणि केंद्रे यांच्या लक्षात आली. त्यांनी रविवारचे औचित्य साधून स्वतःहून एकत्र येत परिसर स्वच्छ करण्याचे ठरवले. हातमोजे घालून टेकडीवरील विखुरलेला कचरा गोळा केला आणि गोण्यांमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावली.
स्वतःच्या आरोग्याबरोबरच परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या या चौघांच्या पुढाकाराचे कौतुक होत आहे. नागरिकांच्या श्रमातून उभ्या राहिलेल्या या परिसराचे सौंदर्य जपण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून मिळाला.

वा अप्रतिम उपक्रम! !! कचरा करणाऱयांना यामुळे नक्कीच कचरा नं करण्याची प्रेरणा मिळेल.
उत्तर द्याहटवा👍👌
उत्तर द्याहटवा