खोटी माहिती देत पोलिसांची दिशाभूल; मद्यधुंद तरुणावर गुन्हा

११२ वर फोन लावून पोलीसांची मजा घ्याल तर पडेल महागात!

परळी वैजनाथ | प्रतिनिधी

आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या पोलिस हेल्पलाइनचा गैरवापर करून पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या तरुणावर परळी ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. पत्ते खेळणाऱ्या काही व्यक्तींबाबत माहिती देत पोलिस तातडीने न आल्यास आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाने पोलिसांची दिशाभूल केल्याचे तपासात समोर आले.

परळी ग्रामीण पोलिस ठाण्याने दिलेल्या प्रेस नोटनुसार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी एका व्यक्तीने डायल ११२ वर वारंवार फोन करून गावात काही लोक पत्ते खेळत असल्याची माहिती दिली. तसेच पोलिस तत्काळ आले नाहीत तर आपण आत्महत्या करू, अशी धमकीही त्याने दिली.या माहितीची गंभीर दखल घेत पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तेथे संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले. त्याने पोलिसांना चुकीची माहिती देऊन पोलिस यंत्रणेची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी तुकाराम नारायण थोरात (वय २६, रा. वाघाळा, ता. परळी वै., जि. बीड) याच्याविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गु.र.नं. ४७१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम २१२, २२३ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ८५(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक बीड, अपर पोलिस अधीक्षक अंबाजोगाई आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

११२ चा गैरवापर टाळण्याचे पोलिसांचे आवाहन

डायल ११२ ही नागरिकांसाठी आपत्कालीन पोलिस सेवा असून, तिचा वापर केवळ वास्तविक आणि तातडीच्या परिस्थितीत मदतीसाठी करावा, असे आवाहन परळी ग्रामीण पोलिसांनी केले आहे. खोटी माहिती देणे, विनाकारण वारंवार फोन करणे अथवा पोलिसांची दिशाभूल करणे यामुळे गरजू नागरिकांना वेळेत मदत मिळण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.अशा प्रकारे डायल ११२ चा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!