‘अंतिम न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती आदेश द्या....

अंतिम निवड होऊन पाच महिने उलटले, नियुक्ती आदेशाची प्रतीक्षा कायम ; तंत्रज्ञ-३ भरतीतील उमेदवार लटकले!

१५ ऑक्टोबरला आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा

परळी वैजनाथ: प्रतिनिधी

महानिर्मिती च्या तंत्रज्ञ-३ संवर्गातील भरती जाहिरात क्र. ०४/२०२४ अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना न्यायालयीन प्रकरणांच्या अधीन राहून तातडीने नियुक्ती आदेश देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केली आहे. अंतिम निवड होऊन पाच महिने उलटले तरीही नियुक्ती आदेशाची प्रतीक्षा कायम आहे. तंत्रज्ञ-३ भरतीतील उमेदवार नियुक्ती आदेशामुळे लटकले आहेत. तातडीने नियुक्ती आदेश देण्यात यावेत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तंत्रज्ञ-३ भरती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याची मागणी यापूर्वीही संघटनेने केली होती. मात्र, भरती प्रक्रियेशी संबंधित काही न्यायालयीन प्रकरणांमुळे नियुक्ती प्रक्रिया रखडल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या विलंबामुळे निवड झालेल्या उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंता व अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यांच्या वयोमर्यादेवर तसेच रोजगाराच्या संधींवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तंत्रज्ञ-३ पदाची जाहिरात ४ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी, गुणवत्ता निश्चिती आदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. ३० एप्रिल २०२६ रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, अंतिम निवड झाल्यानंतरही नियुक्ती आदेशाची प्रतीक्षा कायम असल्याने उमेदवारांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

      दरम्यान, कोराडी प्रकल्पातील गावातील उमेदवारांना देण्यात आलेल्या २५ अतिरिक्त गुणांच्या तरतुदीबाबत न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे. या प्रकरणामुळे निवड प्रक्रियेवर परिणाम झालेला आहे. मात्र, न्यायालयीन प्रकरणाचा अंतिम निकाल प्रलंबित असताना अन्य निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या रोखणे योग्य नाही. ‘अंतिम न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती आदेश देता येऊ शकतात. तसेच अतिरिक्त गुणांशी संबंधित उमेदवारांच्या नियुक्तीबाबत न्यायालयीन आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करता येऊ शकते. महावितरणच्या तंत्रज्ञ-३ पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यांना नियुक्तीची प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या वयात वाढ होत असून बेरोजगारीमुळे आर्थिक व कौटुंबिक अडचणी निर्माण होत आहेत. १४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू न झाल्यास, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!