गांधी जयंती दिवशी उपोषण करणार....

जमिनीच्या नोंदीवरून वाद; चौकशीच्या मागणीसाठी २ ऑक्टोबरला आमरण उपोषणाचा इशारा

परळी तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार - केशव डाके यांचा इशारा 

परळी वैजनाथ : मौजे लोणी येथील सर्व्हे क्रमांक १२६, १२७, १२८, १३० व १३१ या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर कथितरीत्या चुकीच्या व बेकायदेशीर नोंदी करण्यात आल्याचा आरोप करत केशव नारायण डाके यांनी परळीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित नोंदी दुरुस्त कराव्यात तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास २ ऑक्टोबर २०२६ रोजी महात्मा गांधी जयंतीदिनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

डाके यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या आजोबा राम निळकंठ डाके यांनी सन १९५१ मध्ये मौजे लोणी येथे जमीन खरेदी केली होती. या जमिनीवर राजाराम यादा यांना सालगडी म्हणून शेतीच्या कामासाठी ठेवण्यात आले होते. मात्र, कालांतराने संबंधित व्यक्तींनी जमिनीवर मालकी हक्क सांगण्यास सुरुवात केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

सन १९७६-७७ मध्ये सर्व्हे क्रमांकांपैकी काही जमीन औष्णिक वीज प्रकल्पाचा सर्व्हिस रोड, पाइपलाइन तसेच माजलगाव डावा कालवा यासाठी शासनाने संपादित केल्याचे निवेदनात नमूद आहे. या भूसंपादनाशी संबंधित अवॉर्ड क्रमांक १८२/७७, २७८ आणि ६१/८२ यांचा उल्लेख करत, संबंधित अवॉर्डच्या आधारे मिळणाऱ्या मोबदल्याच्या रकमेबाबतही वाद असल्याचे डाके यांनी म्हटले आहे.

या जमिनीच्या मालकीवरून न्यायालयीन वाद झाल्याचा तसेच जिल्हा न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरण गेल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. आजोबा राम निळकंठ डाके यांचे १० नोव्हेंबर १९८२ रोजी निधन झाले असून त्यानंतरही न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहिल्याचे त्यांनी नमूद केले आहे. न्यायालयीन निर्णयांच्या आधारे नंतर ७/१२ उताऱ्यावर काही व्यक्तींची नावे आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, संबंधित प्रकरणात महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून योग्य कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत डाके यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून दोष आढळल्यास निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

“मी सर्व पुराव्यांसह तक्रार अर्ज सादर केले आहेत. मात्र, कार्यवाही न झाल्यास २ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असून, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत उपोषण सोडणार नाही,” असा इशारा केशव नारायण डाके यांनी निवेदनातून दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!