७१८ खातेदारांना २ कोटी ९० लाखांचे कर्जवाटप
सहूलत पतसंस्थेची वार्षिक सभा; व्याजमुक्त व्यवस्थेचा आग्रह
१३ कोटी ६८ लाखांची उलाढाल; ७१८ खातेदारांना २ कोटी ९० लाखांचे कर्जवाटप
परळी वैजनाथ : येथील सहूलत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि स्वागत समारंभ उत्साहात झाला. संस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १३ कोटी ६८ लाख १७ हजार ३५ रुपयांची वार्षिक उलाढाल केल्याची माहिती सभेत देण्यात आली. व्याजमुक्त अर्थात ‘बिला-सूद’ आर्थिक व्यवस्थेला अधिक व्यापक स्वरूप देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी विचारवंत मुफ्ती सय्यद अशफाक कासमी होते. संस्थेचे चेअरमन सय्यद अनवर जाफर, सचिव जाफर खान, उपाध्यक्ष शेख जमील, विचारवंत मुफ्ती तैमूर मिल्ली आणि व्यवस्थापक शेख सिराज यांची प्रमुख उपस्थिती होती. सय्यद तजम्मुल अफान यांनी कुराण पठण व सूत्रसंचालन केले.
उपाध्यक्ष शेख जमील यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल व ताळेबंद सादर केला. ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेच्या विविध खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ठेवी असल्याचे त्यांनी सांगितले. शेअर भांडवलाच्या ३,७५७ खात्यांमध्ये १ कोटी ७ लाख ७२ हजार ५०० रुपये, तर डेली अकाउंटच्या ३,८०० खात्यांमध्ये १ कोटी १४ लाख ५५ हजार ३२५ रुपयांच्या ठेवी असल्याची माहिती देण्यात आली.
७१८ खात्यांना कर्ज
संस्थेने वर्षभरात ७१८ खातेदारांना एकूण २ कोटी ९० लाख ४५ हजार रुपयांचे कर्ज वितरित केले. हे कर्जवाटप विविध समाजघटकांपर्यंत पोहोचत असल्याचे संस्थेने नमूद केले. व्याजमुक्त कर्ज घेणाऱ्या खातेदारांमध्ये हिंदू बांधवांचा वाटा सुमारे पाच ते सात टक्के असल्याचेही सभेत सांगण्यात आले.
‘महाजनी’ पद्धतीवर टीका
अध्यक्षीय भाषणात मुफ्ती सय्यद अशफाक कासमी यांनी व्याजाधारित कर्जव्यवस्थेवर भाष्य केले. व्याजाच्या वाढत्या बोजामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट निर्माण होते, असा दावा त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर व्याजमुक्त आर्थिक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. संस्थेच्या माध्यमातून या व्यवस्थेचा विस्तार करण्यासाठी संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी अधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुफ्ती तैमूर मिल्ली यांनी देशात शांतता, समृद्धी आणि सामाजिक बंधुभाव कायम राहण्यासाठी सामूहिक दुआ केली. संस्थेचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा