धामोरी बु. येथे कर्करोग जनजागृती व पूर्व तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद



१२७ नागरिकांची तपासणी; डॉक्टर, प्राध्यापक व आरोग्यसेवकांच्या मार्गदर्शनातून जनजागृती

धामोरी बु. (संजय क्षिरसागर ) — कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्याबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आजाराचे वेळेत निदान व्हावे, या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर आणि ग्रामपंचायत कार्यालय, धामोरी बु., ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी कर्करोग जनजागृती व पूर्व तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे, विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले.

शिबिरादरम्यान कर्करोगाची लक्षणे, संभाव्य कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, जीवनशैलीतील आवश्यक बदल तसेच कर्करोगाचे वेळेत निदान झाल्यास उपचारास मिळणारे महत्त्व याबाबत उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. अरविंद गायकवाड यांनी कर्करोग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली.

या आरोग्य शिबिरामध्ये तब्बल १२७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा त्यांच्या परिसरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले.

यावेळी सहयोगी प्राध्यापक डॉ. ऋषिकेश खाडिलकर, श्री. रविंद्र चव्हाण, डॉ. सुधाकर शेळके, श्रीमती ललिता गौतम कीर्तिशाही, श्री. कृष्णा भाऊसाहेब शेळके, श्री. गोरख शेळके आणि श्री. पोफळे यांची उपस्थिती होती.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समाजसेवा अधीक्षक श्री. बालाजी देशमुख, वैद्यकीय शिबिर समन्वयक श्री. इंदल जाधव आणि श्री. दीपक भोजने यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांना मिळाला.

तसेच डॉ. मिश्रा, डॉ. स्पंदना, डॉ. शेषराव कांबळे, डॉ. आसीफ शेख, डॉ. दीपक, श्रीमती विद्या बागुल, श्रीमती भाग्यश्री गायकवाड, श्री. शैलेंद्र शेळके, श्री. यशवंत नंद आणि श्री. संदेश ढेपे यांनी शिबिरात मोलाची सेवा बजावली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!