पिंपळा आकाशवाणी केंद्र दसऱ्यापूर्वी सुरू करा
केंद्राच्या प्रलंबित कामांना गती देण्याची चेतन सौंदळे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
परळी वैजनाथ : अंबाजोगाई तालुक्यातील पिंपळा (धा.) येथे मंजूर करण्यात आलेले आकाशवाणी एफ एम केंद्र दसरा २०२६ पूर्वी नियमित प्रसारणासह कार्यान्वित करावे, तसेच केंद्राशी संबंधित सर्व प्रलंबित कामांना तातडीने गती द्यावी, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषद, परळीचे अध्यक्ष चेतन सौंदळे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मा. अश्विनी वैष्णव यांच्याकडे दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी ई-मेलद्वारे निवेदन करून केली आहे.
पिंपळा (धा.) येथे आकाशवाणी एफ एम केंद्र सुरू करण्यासाठी चेतन सौंदळे यांनी दि. २ ऑक्टोबर २०२१ रोजी दूरदर्शन उच्चशक्ती प्रक्षेपण केंद्रावर उपोषण केले होते. या आंदोलनाची दखल घेत पिंपळा (धा.), अंबाजोगाई येथे आकाशवाणी एफ एम केंद्र सुरू करण्यासाठीचा मंजुरी प्रस्ताव प्रसारभारती/केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आणि त्यास मंजुरी मिळाली.
त्यानंतर मंजूर करण्यात आलेल्या आकाशवाणी केंद्रांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दि. १९ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने पार पडला. पिंपळा आकाशवाणी एफ एम केंद्राचाही या मंजूर प्रकल्पामध्ये समावेश असून, या उद्घाटनानंतरही केंद्राचे नियमित एफ एम प्रसारण अद्याप सुरू झालेले नाही.
पिंपळा आकाशवाणी केंद्रासाठीच्या पाठपुराव्यात माजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री श्री. प्रकाश जावडेकर, माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे, माजी मंत्री आमदार श्री. धनंजय मुंडे, खासदार श्रीमती पूनमताई महाजन, खासदार श्रीमती रजनीताई पाटील, खासदार श्रीमती सुप्रियाताई सुळे, आमदार श्रीमती नमिताताई मुंदडा आणि माजी आमदार श्री. संजयभाऊ दौंड यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा केला.
या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर दि. १९ जानेवारी २०२४ रोजी पिंपळा आकाशवाणी एफएम केंद्राच्या प्रकल्पाचे ऑनलाइन उद्घाटन झाले, मात्र प्रत्यक्ष एफ एम प्रसारण अद्याप सुरू न झाल्याने या केंद्राची प्रतीक्षा कायम आहे.
पिंपळा आकाशवाणी केंद्र कार्यान्वित झाल्यास बीड, लातूर, परभणी, धाराशिव आणि नांदेड या पाच जिल्ह्यांतील नागरिकांना कृषी, शिक्षण, रोजगार, शासकीय योजना, आरोग्य, जनजागृती तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती स्थानिक एफ एम सेवेच्या माध्यमातून उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच ‘मन की बात’सह आकाशवाणीचे विविध कार्यक्रम स्थानिक एफ एम सेवेच्या माध्यमातून ऐकण्याची सुविधा नागरिकांना मिळू शकणार आहे.
याशिवाय या परिसरातील कलाकार, लोककलावंत, गायक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिभावंतांना स्थानिक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी पिंपळा येथे स्थानिक आकाशवाणी स्टुडिओ उभारण्याची मागणीही सौंदळे यांनी केली आहे.
त्यामुळे पायाभरणी व उद्घाटनाची प्रक्रिया पूर्ण झालेल्या पिंपळा आकाशवाणी एफएम केंद्राशी संबंधित उर्वरित सर्व कामे तातडीने पूर्ण करून दसरा २०२६ पूर्वी प्रत्यक्ष नियमित एफ एम प्रसारण सुरू करावे, तसेच स्थानिक आकाशवाणी स्टुडिओच्या निर्मितीसाठी कालबद्ध कार्यवाही करावी, अशी मागणी चेतन सौंदळे यांनी केली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा