गावभागातील वारंवार वीज खंडित होण्याने नागरिक त्रस्त; कन्याशाळा फीडरची तातडीने तांत्रिक तपासणी करा

तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करा अन्यथा तीव्र आंदोलन- अनंत इंगळे

परळी वैजनाथ : प्रतिनिधी

    परळी वैजनाथ शहरातील गावभाग परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लघु व्यावसायिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

   कन्याशाळा फीडरअंतर्गत येणाऱ्या मिलिंदनगर, मोमीनपुरा, भीमनगर, बरकत नगर, फतेहनगर, शिवनगर, इंदिरानगर, संभाजीनगर, रेहमतनगर, पद्मावती, आनंदनगर, साठेनगर, उखळवेस, कृष्णानगर, मल्हारनगर, सिद्धेश्वरनगर, गंगासागरनगर, खुदबेनगर, इशानगर, इक्बालनगर आदी भागात दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, सध्या दुष्काळजन्य परिस्थितीत पाणीपुरवठ्यासह विविध कामांवरही त्याचा परिणाम होत आहे. रात्रीच्या वेळी वीज खंडित होण्यामुळे परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून, चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढत आहे.     

     महावितरणने कन्याशाळा फीडरची तातडीने संपूर्ण देखभाल व तांत्रिक तपासणी करावी तसेच वीजवाहिनीत बिघाड झाल्यास वीजपुरवठा तातडीने सुरू करता यावा, यासाठी स्पेअर अथवा पर्यायी चार्ज लाईनची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.वारंवार वीज खंडित होण्यामागील कारणांचा तांत्रिक अहवाल तयार करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच फ्यूज कॉलसाठी जबाबदार व सक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना तात्काळ प्रतिसाद देण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात, परिसरातील विद्युत यंत्रणेची पाहणी करून आवश्यकतेनुसार नवीन डी.पी., केबल, वाहिनी व इतर तांत्रिक साधने उपलब्ध करून वीजपुरवठा अधिक सक्षम करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रतिलिपी आ. धनंजय मुंडे यांनाही देण्यात आली आहे.

      गावभागातील हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून, निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ प्रत्यक्ष पाहणी व आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी अनंत इंगळे यांनी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या रास्त मागण्यांसाठी महावितरण कार्यालयासमोर लोकशाही व सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!