शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत व अन्य उपाययोजनांवर चर्चा
दुष्काळ प्रश्नी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले
पीएम किसान व नमो शेतकरी सन्मान चे दोन दोन हप्ते तातडीची मदत म्हणून वितरीत करण्याची मागणी
मुंबई (प्रतिनिधी) - राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून शेतीपिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत मिळायला काही कालावधी लागेल, तोपर्यंत केंद्र सरकारच्या पीएम किसान योजना व राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजना यामधून तातडीच्या मदतीसाठी किमान सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन हफ्ते एकत्रितपणे वितरीत करण्यात यावेत, जेणेकरून कोलमडलेल्या शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळेल, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी, यांसह विविध प्रश्नी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. धनंजय मुंडे यांनी आज मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.
मागील आठवड्यात परळी - अंबाजोगाई तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधत धनंजय मुंडे यांनी आपण लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांना तातडीच्या आर्थिक मदत व अन्य उपाययोजनांबाबत मागणी करणार असल्याचे सांगितले होते.
पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा यांसह जलसंधारणाची कामे आदींबाबत शासन प्राधान्याने नियोजन करत असून, शेतकरी - शेतमजुरांना उभे करण्यासाठी विविध उपाययोजना व सर्वतोपरी मदत करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी यावेळी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा