वैद्यनाथ कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी 

महात्मा गांधी व शास्त्री यांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी — प्राचार्य डॉ. आर. डी. राठोड

परळी वैजनाथ : येथील जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीच्या निमित्ताने  राज्यशास्त्र विभागाच्या वतीने मतदान जागृती, तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून ‘मानवतेसाठी आत्मजाणीव’ या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. राठोड होते. यावेळी विद्यापीठ विद्यापरिषद सदस्य व प्राध्यापक प्रतिनिधी  डॉ. पी. एल. कराड, उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्रा. डी. के. आंधळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. माधव रोडे, समन्वयक प्रा. उत्तम कांदे आणि स्टाफ सेक्रेटरी डॉ. एम. जी. लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.


          कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एम. जी. म्हैत्रे     यांनी करून कार्यक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. यावेळी डॉ. माधव रोडे यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. गांधीजींचे सत्य, अहिंसा, स्वच्छता, स्वावलंबन व मानवतेचे विचार, तसेच शास्त्रीजींची साधी राहणी, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेची भावना यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. आर. डी. राठोड म्हणाले की, “महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचे विचार केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून आजच्या सामाजिक जीवनासाठीही मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन सत्य, अहिंसा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठा ही मूल्ये आपल्या जीवनात रुजवावीत.” लालबहादूर शास्त्री यांनी देशवासीयांना ‘जय जवान, जय किसान’ हा प्रेरणादायी नारा दिला. देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीमध्ये शेतकरी महत्त्वाचा कणा असून कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणाला विशेष महत्त्व असल्याचेही त्यांनी नमूद केले.जयंतीनिमित्त रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मतदान जागृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही प्रक्रियेविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. तसेच ‘मानवतेसाठी आत्मजाणीव’ या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, मानवता आणि सामाजिक जबाबदारी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप गायकवाड यांनी केले, तर आभार डॉ.धांडे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!