जायकवाडीच्या हक्काच्या पाण्यासाठी १४० गावांचा एल्गार!
सिंदफणा काठ पेटला; गावोगावी जनजागृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद, नाथापूरच्या महाबैठकीतून निर्णायक लोकलढ्याची तयारी
वडवणी, प्रतिनिधी :
बीड जिल्ह्यातील वंचित भागातील शेतीला जायकवाडी धरणाचे हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी सिंदफणा नदीकाठावरील तब्बल १४० गावांतील शेतकरी एकवटले असून, हक्काच्या पाण्यासाठी लोकलढ्याचा एल्गार उभा राहिला आहे. या लढ्याची व्याप्ती वाढत असून गावोगावी बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. नाथापूर येथे होणाऱ्या महाबैठकीच्या पार्श्वभूमीवर लोकलढा समितीच्या वतीने प्रत्येक गावात जाऊन जनजागृती केली जात असून, या अभियानाला शेतकरी, तरुण, महिला आणि ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
बीड जिल्ह्यातील अनेक भाग सध्या भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या संकटाला सामोरे जात आहेत. सोयाबीन, कापूस, तूर यांसारखी पिके पाण्याअभावी वाया गेली आहेत. फळबागा अखेरच्या घटका मोजत आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर पाण्याअभावी ऊस पिकेही संकटात सापडली आहेत. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने शेतकऱ्यांच्या मनातील असंतोष आता संघटित लोकलढ्याच्या रूपाने पुढे येत आहे.
सिंदफणा नदी ही बीड जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक असून, तिच्या काठावरील १४० गावांतील शेतकऱ्यांनी जायकवाडीच्या हक्काच्या पाण्यासाठी हा लढा उभा केला आहे. श्रीक्षेत्र भगवानगड ते माजलगाव तसेच गोदावरी-अमृतानदी ते सिंदफणापट्ट्यातील शेतीला जायकवाडी धरणाचे हक्काचे पाणी मिळावे, ही या भागातील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.
जायकवाडीचे पाणी शेतीला मिळावे यासाठी नाथापूर येथे लोकलढा आंदोलनाच्या वतीने महाबैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या महाबैठकीची माहिती गावागावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकलढा समितीचे समन्वयक प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन बैठक घेत आहेत. गेल्या काही दिवसांत आमला, वाहेगाव, रामेश्वर, मालेगाव, नांदलगाव, आडगाव, रामगाव, महांडुळा, मानेवस्ती, चोरपुरी, बालानाईक तांडा, पांढरेवस्ती आदी ठिकाणी बैठका घेण्यात आल्या आहेत.
या बैठकींना शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असून, पाण्यासाठी उभ्या राहिलेल्या या लोकलढ्याला प्रत्येक गावातून नागरिकांचे सहकार्य मिळत आहे. शेतकरी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी आता गावाच्या चौकातून पुढे येत मैदानात उतरला आहे. तरुणाई आणि महिलांचाही या आंदोलनात सहभाग वाढत असल्याचे चित्र आहे.
नाथापूर येथे होणारी महाबैठक 'ना भुतो ना भविष्यती' अशा स्वरूपाची करण्यासाठी गावोगावी जोरदार तयारी सुरू आहे. जनजागृती बैठकींना मिळणारा प्रतिसाद पाहता हा प्रश्न आता केवळ काही गावांचा राहिलेला नसून १४० गावांच्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आणि शेतीच्या भवितव्याचा प्रश्न बनला आहे.
गावोगावी सुरू असलेल्या बैठका, वाढत जाणारा शेतकरी सहभाग आणि मिळत असलेले व्यापक जनसहकार्य यामुळे जायकवाडीच्या हक्काच्या पाण्यासाठी उभा राहिलेला हा लोकलढा अधिक व्यापक होत आहे. हक्काचे पाणी मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून, हा लोकलढा शंभर टक्के यशस्वी होईल, असा विश्वास आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा