श्रद्धेला सामाजिक बांधिलकीची जोड; मच्छिंद्रनाथ देवस्थानाला २.५१ लाखांची चांदी अर्पण कडा : प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील श्रीक्षेत्र मायंबा मच्छिंद्रनाथ देवस्थानाच्या विकासासाठी भाविक, उद्योजक आणि दानशूर व्यक्तींकडून सहकार्याचा ओघ वाढला आहे. आष्टी तालुका मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तथा युवा उद्योजक अशोक चौधरी यांनी देवस्थानासाठी एक किलो चांदीची वस्तूरूप देणगी दिली. सुमारे २ लाख ५१ हजार रुपये किमतीची ही देणगी बुधवार, १२ ऑगस्ट रोजी आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत देवस्थानाकडे सुपूर्द करण्यात आली. श्रीक्षेत्र मायंबा मच्छिंद्रनाथ देवस्थान हे आष्टी तालुक्यासह राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देवस्थानाच्या विकासासाठी विविध स्तरांतून प्रयत्न सुरू असून, आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर उभारणीसह विविध विकासकामांना गती देण्यात येत आहे. या विकासकामांना हातभार लागावा, या उद्देशाने अशोक चौधरी यांनी रोख रकमेऐवजी चांदीच्या स्वरूपात देणगी देत धार्मिक श्रद्धेसोबत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. चौधरी यांनी दिलेली १ हजार ग्रॅम म्हणजेच एक किलो चांदी देवस्थानाच्या...