नांदेड-पनवेल एक्स्प्रेस दौंडपर्यंतच धावणार; रेल्वे प्रशासनाचा निर्णय
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असून, गाडी क्रमांक 17614 नांदेड–पनवेल एक्स्प्रेस ही 7 जुलै 2026 रोजी नांदेडहून सुटल्यानंतर केवळ दौंड स्थानकापर्यंतच धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या संदेशानुसार, कार्यान्वयनासंबंधी (Operational Reasons) कारणांमुळे या गाडीचा प्रवास दौंड येथेच समाप्त (Short Terminated) करण्यात आला आहे. त्यामुळे दौंडनंतर पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी लागणार आहे.
विशेष म्हणजे, उद्या (8 जुलै) आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या आषाढी वारीच्या प्रस्थान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी मराठवाड्यासह विविध भागांतून मोठ्या संख्येने वारकरी पुणे आणि आळंदीकडे रवाना झाले आहेत. अशा वेळी नांदेड–पनवेल एक्स्प्रेस दौंडपर्यंतच धावणार असल्याने वारकऱ्यांसह इतर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
या अचानक झालेल्या बदलामुळे परळी, लातूर रोड, उस्मानाबाद आणि मार्गावरील इतर स्थानकांवरील प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत माहितीनुसार गाडीची सद्यस्थिती तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
किमान पुण्यापर्यंत गाडी घेऊन जाण्याची भाविकांची मागणी
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान साठी सहभागी होण्यासाठी नियोजित केलेल्या दिनांक सात आठ नऊ या तीन दिवसाच्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी किमान ही ट्रेन पुण्यापर्यंत तरी घेऊन जावी अशी भाविकांची आग्रही मागणी आहे.
मोहन साखरे,प्रवाशी.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा