थरारक : घाटात फिल्मी स्टाईलने कुटुंबाचे अपहरण; पावणेदोन लाखांची लूट, सहाजणांविरुद्ध गुन्हा
बीड, ता. १० : मांजरसुंबा घाटात कार अडवून कोयत्याचा धाक दाखवत एका कुटुंबाचे अपहरण करून त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याची अंगठी तसेच एटीएम आणि ऑनलाइन व्यवहाराद्वारे सुमारे १ लाख ८० हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात सहाजणांविरुद्ध अपहरण, दरोडा, मारहाण आणि धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील श्रीपाद गंगाधरराव कुलकर्णी (वय ५०) हे त्यांचे मानस-वडील विजयसिंह रणनवरे आणि मानस-आत्या सुवर्णमाला रणनवरे यांच्यासह कारने वालवड येथून छत्रपती संभाजीनगरकडे निघाले होते. मांजरसुंबा घाट परिसरात काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आलेल्या आरोपींनी त्यांची कार अडवली.
उदयसिंह उर्फ सोनू सत्यजितसिंह जाधव (रा. गणेगाव, ता. भूम), अझर सय्यद, निखिल, राहुल काळे (सर्व रा. भूम, जि. धाराशिव) तसेच अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी कुलकर्णी यांना कोयत्याचा धाक दाखवत तिघांनाही जबरदस्तीने स्कॉर्पिओमध्ये बसवून अपहरण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
आरोपींनी फिर्यादींकडील सुमारे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ४० हजार रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली. तसेच एटीएमद्वारे ४० हजार रुपये काढून घेतले आणि गुगल पेच्या माध्यमातून आणखी ५० हजार रुपये बळजबरीने हस्तांतरित करून घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान, वृद्ध नातेवाईकांच्या नावावरील मालमत्ता आणि बँकेतील मुदतठेवी स्वतःच्या नावावर करून देण्यासाठी आरोपींनी पीडितांना गणेगाव येथील घरात डांबून ठेवत जिवे मारण्याची धमकी दिली.
पीडितांनी संधी साधून 'डायल ११२' वर संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांची सुटका केली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक मंगेश भागवत साळवे पुढील तपास करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा