यापुर्वीही घडली होती अशीच घटना...ऑटो प्रवासाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर!!!

खळबळजनक : बँकेतून दीड लाखाची रक्कम काढताच दोन ते तीन जणांनी ऑटोत बसवून महिलेचे परळीतून केले अपहरण


परळी वैजनाथ | प्रतिनिधी

      परळीतील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतून दीड लाख रुपये काढून घराकडे निघालेल्या परळी शहरातील साठेनगर परिसरातील एका महिलेचे अज्ञात दोन ते तीन आरोपींनी अपहरण करून तिला जबरदस्तीने ऑटोरिक्षामध्ये बसवून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची एक बसून दागिने लुटण्याची घटना परळीमध्ये घडली होती या घटनेचीच पुनरावृत्ती आजच्या घटनेने झाली आहे त्यामुळे ऑटो चा प्रवास आणि सुरक्षितता हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे दरम्यान घडलेली घटना ही  संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हद्दीतील असताना संभाजीनगर व शहर पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही मात्र परळी ग्रामीण पोलिसांनी याबाबतीत तत्परता दाखवत महिलेचा शोध घेतला. ही महिला गंगाखेड येथे मिळून आली आहे.

         मिळालेल्या माहितीनुसार, परळी वैजनाथ शहरातील साठेनगर येथील विकी वसंत वाघमारे यांनी पोलिसांना माहिती दिली की, त्यांची आई तारामती वसंतराव वाघमारे या एसबीआय बँकेच्या राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक शाखेतून सुमारे ₹1.50 लाखांची रक्कम काढून परत येत असताना ३ ते ४ अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने पकडून ऑटोरिक्षात बसवले. आरोपी त्यांना कनेरवाडी रोडच्या दिशेने घेऊन जात असून मारहाण करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. एक पथक अंबाजोगाई मार्गे तर दुसरे गंगाखेड–परभणी मार्गे शोधासाठी रवाना झाले. शोध मोहीमेदरम्यान परभणी स्थानिक गुन्हे शाखा तसेच गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डोंगरे यांचीही मदत घेण्यात आली.

            दरम्यान, महिलेचा मोबाईल सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे लोकेशन काढण्यात आले. त्यानुसार महिलेचे लोकेशन गंगाखेड बसस्थानक परिसरात असल्याचे स्पष्ट झाले.यानंतर पोलिसांनी तात्काळ गंगाखेड येथे धाव घेत महिलेची सुखरूप सुटका केली. ही घटना संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पुढील कायदेशीर कारवाईसाठी महिलेला संबंधित पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

         या कारवाईत पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेंडके, पोलीस हवालदार हारगावकर, पवार, वडमारे तसेच पोलीस अंमलदार केदार, वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. दरम्यान, अपहरणामागील नेमके कारण, आरोपींची ओळख आणि रोख रकमेबाबतची माहिती तपासानंतर स्पष्ट होणार असून, संबंधित पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...