कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन समर्थन समिती, परळी
परळीकरांची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी; टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी
परळी / प्रतिनिधी
NEET आणि इतर परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या प्रकरणांवरून देशभरात वातावरण तापलेले असतानाच, आता महाराष्ट्रातील 'शिक्षक पात्रता परीक्षा' (TET) पेपरफुटीचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. 'कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन समर्थन समिती, परळी वै.' यांच्या वतीने थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना याबाबतचे निवेदन पाठवण्यात आले आहे.
दिल्लीतील आंदोलनाचा दाखलासमितीने दिलेल्या निवेदनानुसार, NEET आणि इतर परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ गेल्या २० ते २२ दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्या सहभागातून देशव्यापी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी केली जात आहे. मात्र, केंद्र सरकार यावर कोणतीही ठोस प्रतिक्रिया देत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.राज्यातील TET परीक्षेवरून सरकारवर निशाणायाच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातही TET परीक्षेची पेपर फुटी झाल्याची घटना घडल्याचे या निवेदनात म्हटले आहे की.
"फडणवीस सरकारने यावर शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही किंवा त्यांची जबाबदारी निश्चित केलेली नाही," असा थेट आरोप समितीने केला आहे.TET पेपरफुटी प्रकरणी राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनाच जबाबदार धरून, नैतिकतेच्या आधारावर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा, अशी मागणी परळीकरांच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र अजूनही नैतिकता आणि जबाबदारी पाळण्यात सक्षम आहे,
हे या कारवाईतून दाखवून द्यावे, अशी नम्र विनंती 'कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन समर्थन समिती'ने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी प्रा.विलास रोडे, प्रा. दासू वाघमारे, अशोक मुंडे,सिद्धार्थ जगतकर, अनिल मस्के, पत्रकार विकास वाघमारे , नवनाथ दाणे, केशवराज मुंडे, महादेव आजले, सुरेश मुंडे, राजेभाऊ जगतकर, अँड प्रकाशराव मुंडे, भालचंद्र ताटे, बालासाहेब घाडगे, सुरेश गंगावणे, लक्ष्मण चव्हाण, एल.डी. घोबाळे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा