१४ संशयित ताब्यात: संभाजीनगरचे १० संशयित...पाकिस्तानी गॅंगस्टरशी संबंध असल्याचा संशय
ATS Raid Marathwada | बीड मधून एकाला उचलले ;छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये एटीएसची एकाचवेळी छापेमारी
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि डोग्रा गँगशी लागेबांधे असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी (दि. १०) छत्रपती संभाजीनगरसह बीड आणि जालना येथे एकाचवेळी छापेमारी केली. पहाटेच्या सुमारास टाकण्यात आलेल्या या धाडीत तब्बल १४ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणात एटीएसने गेल्या तीन महिन्यांत केलेली ही दुसरी कारवाई असून, एनआयएच्या पथकानेही वाळूज येथे गेल्या महिन्यात अशीच एक कारवाई केली होती. सोशल मीडियाद्वारे हे संशयित शहजाद भट्टी गँगच्या संपर्कात असल्याचा एटीएसला दाट संशय आहे.
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी हा मूळचा पाकिस्तानातील लाहोर येथील रहिवासी असून, तो सध्या दुबईत बसून आपली गुन्हेगारी टोळी चालवत असल्याचे समोर आले आहे. देशातील तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना कट्टरतावाद आणि हेरगिरीच्या जाळ्यात ओढण्याचा त्याचा डाव आहे. त्याच्याशी सोशल मीडियाद्वारे काही तरुण संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले. या संशयावरून एटीएसने ही धरपकड केली आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवरून गँगस्टर्सशी संपर्क ठेवणारे, त्यांच्या पोस्टना प्रतिसाद देणारे किंवा समर्थन करणारे अनेक जण आता एटीएसच्या रडारवर आले आहेत.
संभाजीनगरचे १० संशयित
एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत छत्रपती संभाजीनगर येथील सर्वाधिक १० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये वैजापूर (२), मिर (३), हर्सल (१), आरिफ कॉलनी (१), बायजीपुरा (१) व अन्य भागातील दोघांचा समावेश आहे. तसेच जालना येथून २ तर बीड येथून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
मोबाईल आणि सीडीआरची सखोल तपासणी
पाकिस्तानी गँगस्टरसोबत या तरुणांचे काही आर्थिक व्यवहार किंवा संभाषण झाले आहे का, हे तपासण्यासाठी एटीएसने या सर्व १४ जणांचे मोबाईल फोन, कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) आणि सोशल मीडिया खात्यांची सखोल तपासणी सुरु केली आहे. या कारवाईनंतर एटीएस कार्यालयाच्या बाहेर संशयितांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. यापूर्वी मे महिन्यातही एटीएसने १३ संशयितांची चौकशी केली होती. मात्र, त्यावेळी तांत्रिक तपासात संशयास्पद असे काहीही निष्पन्न न झाल्याने चौकशीअंती त्यांना सोडून देण्यात आले होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा