औषध घेण्यासाठी रिक्षा थांबवली अन् अज्ञात चोरट्याने लंपास केली १ लाखांची रक्कम
बीड शहरातील बार्शी रोडवरील राजलक्ष्मी मेडिकलसमोरून एका रिक्षातून तब्बल १ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माणिक दत्तात्रय रांजवण (वय ३६, रा. आहेर वडगाव, ता.जि. बीड) हे त्यांचे मावस भाऊ कृष्णा डरपे यांच्या शिवम ॲग्रो एजन्सी या दुकानात मजुरी काम करतात. त्यांचे मावस भाऊ गावी गेले असल्याने माणिक यांनी दिवसभर दुकान सांभाळले. रात्री आठ वाजेच्या सुमारास दिवसभराच्या खत व बी-बियाणांच्या विक्रीची झालेली १ लाख रुपयांची रोकड एका बॅगेत भरून ते रिक्षाने (क्रमांक MH 23 X 5360) धांडे नगर येथे देण्यासाठी निघाले.
प्रवासादरम्यान बार्शी रोडवरील राजलक्ष्मी मेडिकलसमोर त्यांनी औषध घेण्यासाठी आपली रिक्षा थांबवली आणि ते मेडिकलमध्ये गेले. औषधे घेऊन परत आल्यावर त्यांना रिक्षात ठेवलेली पैशांची आणि टिफिनची बॅग गायब झाल्याचे दिसून आले. आजूबाजूला शोध घेऊनही बॅग न सापडल्याने अखेर त्यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस हवालदार शालिनी उबाळे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा