प्रामाणिकपणाची ‘गौरव’ गाथा! : ‘सापडले ते आपले नाही’ प्रेरक दृढ भावना

एटीएम मध्ये सापडली रक्कम; गौरव इंगळेंनी स्वतः पोलीसात जावून केली स्वाधीन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :
        आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी प्रवृत्तीच्या काळात माणुसकी, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करणाऱ्या घटना निश्चितच प्रेरणादायी ठरतात. परळी शहरातील गौरव  इंगळे यांनी याचा प्रत्यय देत एटीएममध्ये सापडलेली ₹३ हजारांची रक्कम स्वतःकडे न ठेवता पोलिसांच्या स्वाधीन केली.प्रश्न रक्कम किती होती हा नाही तर सजग व प्रामाणिकपणा याचे हे उदाहरण ठरले आहे.
        आयडीबीआय बॅकेच्या बाजुला असलेल्या एटीएममध्ये गौरव इंगळे यांना तीन हजार रुपयांची रक्कम सापडली. ही रक्कम आपली नसल्याचे लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ती संभाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन ती जमा केली. आजच्या काळात सापडलेली वस्तू किंवा रक्कम स्वतःकडे ठेवण्याचा मोह अनेकांना होऊ शकतो. मात्र, ‘सापडले ते आपले नाही’ ही जाणीव मनात ठेवून गौरव इंगळे यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा समाजासाठी आदर्श ठरणारा आहे. त्यांच्या या कृतीतून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा सुंदर संदेश मिळत आहे. गौरव इंगळे यांच्या या प्रामाणिक व कौतुकास्पद कार्याबद्दल श्री वैद्यनाथ भक्ती मंडळ, परळी वैजनाथ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रामाणिकपणा हा केवळ शब्द नसून तो कृतीतून सिद्ध करावा लागतो; गौरव इंगळे यांनी हे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

नेमकं घडलं काय?
     गौरव इंगळे हा सामाजिक भान असलेला युवक आहे.गौरव इंगळे वैद्यनाथ भक्ती मंडळ या सेवाभावी व सामाजिक संघटन मध्ये काम करतो. गौरव इंगळे याला काही रक्कम काढायची होती. त्यासाठी तो बँकेच्या एटीएम मध्ये गेला होता मात्र त्याचे स्वतःचेच एटीएम कार्ड हरवले असल्याचे त्याच्या लक्षात आले. हरवलेले एटीएम कार्ड शोधत शोधत पुन्हा एकदा तो एटीएम मध्ये आला असताना त्याला एटीएम मशीन मधून तीन हजार रुपये रक्कम आढळून आली. ही आपली रक्कम नाही, आजूबाजूलाही कोणी नव्हते. त्यामुळे सजग नागरिकाचे कर्तव्य पार पाडत गौरव यांनी थेट संभाजीनगर पोलीस स्टेशन गाठले आणि त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या ठाणे अंमलदारांकडे ती रक्कम घडलेला प्रकार सांगून सुपूर्द केली. त्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल ठाणे अंमलदार थळकरीअप्पा यांनी त्याचे कौतुक केले.त्याचबरोबर वैद्यनाथ भक्ती मंडळातील सदस्यांना कळल्यानंतर त्याचा सत्कार करण्यात आला. आजच्या काळात त्याने दाखवलेली ही कृती प्रामाणिकपणाचे उदाहरण ठरली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार