तळे राखेल तरच पाणी टिकेल' या अनुषंगाने प्रशासनाचा निर्णय..

दुष्काळाचे गंभीर संकट; पाणीसाठ्याची राखण करण्याची वेळ; वाण धरणावर २४ तास पहारा तैनात !

तळे राखेल तरच पाणी टिकेल' या अनुषंगाने प्रशासनाचा निर्णय

परळी वैजनाथ : प्रतिनिधी...

      परळी वैजनाथ तालुक्यात दुष्काळाची झळ दिवसेंदिवस तीव्र होत असून, तालुक्यातील प्रमुख जलसाठ्यांमध्ये उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. आठ प्रमुख जलसाठ्यांपैकी तीन जलसाठ्यांमध्ये १० टक्क्यांपेक्षाही कमी पाणी शिल्लक राहिले आहे. शहरासह तालुक्यातील १५ गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पातही केवळ १९.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची चिन्हे आहेत. या अनुषंगाने नागापूर येथील वान धरणावर प्रशासनाच्या पथकाकडून 24 तास पहारा देण्यात येत आहे यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

      एकीकडे जलसाठे आटत आहेत, तर दुसरीकडे उन्हाळ्यापूर्वीच पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन, अवैध उपसा रोखणे आणि पर्यायी जलस्रोतांचा तातडीने विचार  करणे या तिन्ही आघाड्यांवर आता निर्णायक पावले उचलण्याची गरज आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जलस्त्रोतांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपायजना उपायोजना प्रशासनाकडून राबवल्या जात आहेत यामध्ये परळीचे तहसीलदार विनोद रणवरे यांनी अनधिकृत पाणी उपशावर कठोर कारवाया केल्या असून त्यानंतर आता त्यांनी परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या नागपूर येथील वान धरणाच्या जलसाठ्याचे राखण करण्यासाठी 24 तास पहारा देणाऱ्या पथकांची नियुक्ती केली आहे.


*वाण धरणावर २४ तास पथक तैनात*

-------------------     

    पाणीटंचाईची संभाव्य तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने आता जलसाठ्यांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वाण प्रकल्पातील पाण्याचा अनधिकृत व अवैध उपसा रोखण्यासाठी २४ तास पथक तैनात करण्यात आले आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे संरक्षण, काटकसरीचा वापर आणि पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

       या पथकात ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी, तलाठी व महसूल सेवक, नगरपरिषद कर्मचारी, महावितरण कर्मचारी, लघुपाटबंधारे विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच पोलीस पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. जलसाठ्यातून कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेने अनधिकृतपणे पाणी उपसा करू नये, यासाठी प्रशासनाकडून प्रभावी नियंत्रण ठेवले जाणार आहे. बारा तासाच्या दोन पाळ्यांमध्ये दोन पथक हा पहारा येणार आहेत. सकाळी आठ ते सायंकाळी आठ या पाळीसाठी एक पथक व सायंकाळी आठ ते सकाळी आठ या पाळीसाठी एक पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकामध्ये विविध गावचे ग्रामपंचायत कर्मचारी,महसूल कर्मचारी,नगरपरिषद कर्मचारी, लघुपाटबंधारे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील आदींचा समावेश आहे.

*@@@*

" वाण धरणाची एकूण क्षमता सुमारे १९.७१ दशलक्ष घनमीटर असून, सध्या त्यातील उपयुक्त साठा २० टक्क्यांच्या आत आला आहे. परळी शहराला तसेच तालुक्यातील सुमारे १५ गावांना या जलस्रोताचा आधार आहे. त्यामुळे वाणमधील पाणीसाठा आणखी कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जलस्त्रोतांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने २४ तास पहारा देण्यात येत असुन त्यासाठी नियोजन करून पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे."

  *- विनोद रणवरे, तहसीलदार, परळी वैजनाथ.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!