ब्लॅक पँथर मोनू सिंगचे परळीत अभूतपूर्व स्वागत; परळीकरांच्या प्रेमाने भारावला!
परळीकरांचे स्वागत माझ्या आयुष्यात अविस्मरणीय- मोनू सिंग
नगराध्यक्षांकडून औक्षण; ठिकठिकाणी हारतुरे, ढोल-ताशांचा गजर, परळीकरांकडून अतिविशिष्ट शिष्टाचारात आदरातिथ्य
परळी वैजनाथ, प्रतिनिधी :
आईच्या आरोग्यासाठी केलेला नवस पूर्ण करण्यासाठी बिहारपासून धावत तीर्थयात्रेला निघालेल्या १९ वर्षीय मोनू सिंग ऊर्फ ‘मोनू ब्लॅक पँथर’ याचे परळी वैजनाथ नगरीत उत्साहात स्वागत करण्यात आले. परळीच्या नगराध्यक्षांच्या हस्ते औक्षण, ढोल-ताशांचा गजर, ठिकठिकाणी हारतुरे देत परळीकरांनी अतिविशिष्ट शिष्टाचारात आतिथ्य करत त्याचे स्वागत केले. या प्रेमळ अकल्पनीय स्वागता मोनू भारावून गेला. बिहार ऊन निघाल्यापासून आजपर्यंतच्या प्रवासात त्याचे कुठेही झाले नसेल एवढे अभूतपूर्व व अविस्मरणीय स्वागत झाल्याची भावविभोर प्रतिक्रिया त्याने यावेळी व्यक्त केली.
आई लालतीदेवी यांची प्रकृती गंभीर असताना, त्या बऱ्या झाल्यास १२ ज्योतिर्लिंग आणि चारधामांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प मोनूने केला होता. आईच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर १५ मार्च २०२६ रोजी त्याने पाटणा येथून यात्रेला सुरुवात केली. दररोज सुमारे ५० किलोमीटर धावत तो आपले ध्येय गाठण्यासाठी पुढे जात आहे. सुमारे १७ हजार किलोमीटरच्या या धाडसी प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यावर मोनूचे परळी वैजनाथमध्ये आगमन झाले. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत त्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
मोनू सिंगचे परळी तालुक्यात आगमन झाल्यापासून ठिकठिकाणी त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. बीड ते परळी रस्त्यावर गावोगावी त्याचे स्वागत झाले. आम्ही परळीकर म्हणून परळीकर नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत संत जगमित्र नागा मंदिर ते वैद्यनाथ मंदिर ढोल ताशाच्या गजरात स्वागत यात्रा काढत त्याचे जोरदार स्वागत केले. परळीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी व अन्य परळीकर महिलांच्या हस्ते त्याचे औक्षण करण्यात आले. हार तुरे, फेटा, पुष्पगुच्छ,भेटवस्तू, ढोल ताशांचा गजर आशा अतिविशिष्ट शिष्टाचारात मोनु सिंगचे परळीकरांनी आदरातिथ्य केले. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू-वैद्यनाथाची त्याने मनोभावे पूजा करून आपल्या आईसाठी केलेल्या संकल्पची पूर्ती पंचम ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी केली. परळीकर नागरिकांनी केलेले अभूतपूर्व व अविस्मरणीय स्वागत असुन आपण भारावून गेलो असल्याची भावना यावेळी मोनुसिंग यांने व्यक्त केली. यावेळी मोठ्या संख्येने परळीकर नागरिक उपस्थित होते.
मातृप्रेमातून मिळाली जिद्दीची प्रेरणा- मोनुसिंग
आईच्या आरोग्यासाठी केलेला नवस पूर्ण करण्याची तळमळ, त्यासाठी अथक परिश्रम आणि श्रद्धेच्या बळावर सुरू असलेली धावती यात्रा आहे. यात्रेच्या प्रवासावर निघालेले असताना अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे अनुभव आले. मात्र महाराष्ट्रात ठीक ठिकाणी मला प्रेम लाभत असून माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात अभूतपूर्व आणि अविस्मरणीय असे प्रेम परळीकरांनी मला दिले आहे अशी भावविभोर प्रतिक्रिया भारावलेल्या मोनुसिंग यांनी यावेळी व्यक्त केली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा