अभिष्टचिंतन विशेष लेख...

वारसा सेवेचा , तळमळ विकासाची, जोड संवेदनशीलतेची  : परळीकरांच्या विश्वासाला मिळाले 'पद्मश्री'  नेतृत्व !

    ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या पावन नगरीच्या विकासाच्या वाटचालीत लोकप्रतिनिधित्वाची भूमिका ही केवळ पदापुरती मर्यादित नसते. नागरिकांच्या अपेक्षा समजून घेणे, शहराच्या प्रश्नांची नाडी ओळखणे आणि उपलब्ध साधनसामग्रीतून विकासाला दिशा देणे, हे त्यामागचे खरे आव्हान असते. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचा आत्तापर्यंतचा सार्वजनिक जीवनातील प्रवास पाहता, सामाजिक बांधिलकी आणि शहराच्या विकासाचा ध्यास या दोन बाबी ठळकपणे समोर येतात.सेवेचा वारसा ,  विकासाची तळमळ, अभ्यासू संवेदनशील नेतृत्व त्यांच्या माध्यमातून परळीला मिळाले आहे. परळीकरांच्या विश्वासाला खऱ्या अर्थाने 'पद्मश्री' मिळाली असल्याचा सकारात्मक आशावाद निर्माण झाला आहे. तमाम परळीकरांचे अतिशय जबाबदारीने, विकासाची नवी दृष्टि आणि नवी दिशा घेऊन प्रथम नागरीक म्हणून प्रतिनिधित्व करणाऱ्या परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचा आज (४ऑक्टोबर) वाढदिवस. त्यानिमित्त त्यांचे मनस्वी अभिष्टचिंतन!!!

       माजी नगराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी यांच्या सुविद्य पत्नी अशी ओळख असलेल्या सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांची आज एक अभ्यासू,संवेदनशील, प्रसंगी खंबीर व लोकांप्रती समर्पित नेतृत्व, लाघवी संवाद या माध्यमातून लोकप्रिय,लोकाभिमुख नगराध्यक्षा अशी स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. परळी नगरीचे नगराध्यक्षपद महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले. त्यावेळी अश्वासक व विश्वसनीय चेहरा म्हणून राजकारणात जनतेची नाडी ओळखण्याचे कसब असलेल्या महायुतीचे नेते आ.धनंजय मुंडे व ना. पंकजाताई मुंडे यांनी तमाम परळीकरांच्या मनातील नाव नगराध्यक्ष पदासाठी पुढे आणले. सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी यांना या दोन दिग्गज नेतृत्वाने एक जबाबदारी आणि दृढ विश्वास अपेक्षित धरत संधी दिली. परळीकर जनतेने या विश्वासावर आपल्या भरघोस मतांची मोहर उमटवली. सार्वजनिक जीवनातील हा टप्पा माजी नगराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी यांच्या लोकप्रिय नेतृत्वाला पत्नी नव्हे तर एक निष्ठावान कार्यकर्तीप्रमाणे दिलेली साथ आणि सामाजिक उपक्रमांमधील सहभाग हा त्यांच्या सार्वजनिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरला असल्याचे दिसून येते. 

        उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी, सामाजिक कार्याची जाण आणि कुटुंबातून मिळालेली सेवाभावी संस्कारांची शिदोरी, या बळावर पद्मश्रीताईंनी सार्वजनिक जीवनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. महिला, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक उपक्रमांशी जोडलेला त्यांचा सहभाग, परळीतील प्रत्येक समाजघटक व प्रत्येक सुख दुखात प्रामाणिकपणे सहवेदना ही त्यांच्या वाटचालीची एक बाजू आहे; तर नगराध्यक्षा म्हणून शहराच्या प्रशासकीय आणि विकासात्मक प्रश्नांना सामोरे जाणे, कधी सुसंवादातून तर कधी कठोर होत खंबीरपणे परळीकर नागरीककेंद्रीत भूमिका  ही त्यांच्या जबाबदारीची दुसरी अधोरेखित होणारी प्रभावी बाजू आहे. शहराचा कारभार जवळून पाहताना शहराच्या प्रश्नांची गुंतागुंत, नागरिकांच्या अपेक्षा आणि प्रशासनाची कार्यपद्धती यांची त्यांना झालेली ओळख  त्यांच्या सार्वजनिक भूमिकेसाठी उपयुक्त ठरली आहे.

         राजकारणात उतरताना एखादी महिला आरक्षित जागेसाठी म्हणून जेव्हा उमेदवारी करत असते त्यावेळेला महिला ही नाममात्र असेल बाकी नेतृत्व पुरुषच करतील असा एक दृढ समज समाजामध्ये रुजलेला आहे. हा समज पद्मश्रीताईंनी आपल्या आतापर्यंतच्या वाटचालीत हा एक गैरसमज असल्याचेच सिद्ध केले आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातूनही परळीच्या नगराध्यक्षांची ही अभासी नव्हे तर एका सक्षम महिलेची कर्तृत्ववान वाटचाल सार्वजनिक जीवनातील महिलांसह सर्वांसाठीच एक प्रेरक उदाहरण ठरली आहे .मात्र, केवळ कुटुंबाच्या कार्यपरंपरेचा वारसा म्हणून नव्हे, तर स्वतःच्या सामाजिक जाणिवेतून काम करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची स्वतंत्र ओळख अधोरेखित करतो.

नगराध्यक्षपद म्हणजे केवळ मिळालेली प्रतिष्ठेची संधी नाही तर शहराच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी, जनतेच्या अपेक्षा, विश्वास जिंकण्याचे आव्हान आहे.त्या पातळीवर खरे उतरण्याची प्रामाणिक स्वयं धडपड सातत्याने दिसून येते.

        नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून ते आजतागायत शहराच्या विकासाला गती देण्याची भूमिका त्यांनी सातत्याने मांडली आहे. नगरपरिषदेच्या  अर्थसंकल्पीय नियोजनात स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, दिवाबत्ती, आरोग्य आणि आर्थिक शिस्त यांसारख्या विषयांवर भर देण्याची जनताभिमुख प्रखर भूमिका त्यांनी घेतल्याचे दिसून येते. विकासकामांच्या आढाव्यापासून ते लोककल्याणकारी उपक्रमांपर्यंत नगरपरिषदेच्या विविध कार्यक्रमांत त्यांची सक्रिय उपस्थिती दिसून आली आहे. महिला सक्षमीकरण हा त्यांच्या कार्यातील महत्त्वाचा विषय राहिला आहे. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावी यासाठी परळी शहरात पाच स्वतंत्र महिला स्वच्छतागृहांचे बांधकाम सुरू केले. अलीकडेच महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या नोंदणीबाबत त्यांनी पात्र महिलांना आवाहन केले. महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रशासकीय प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करण्यावरही त्यांनी भर दिला. नगराध्यक्षा म्हणून महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक नागरी सुविधा निर्माण करणे, महिला आणि युवकांना संधी उपलब्ध करून देणे, हा त्यांच्या विकासदृष्टीचा महत्त्वाचा भाग राहिला असल्याचे दिसून येते.

        परळीचा विकास केवळ सिमेंट- काँक्रीटच्या कामांपुरता मर्यादित नसून, शहराचा पर्यावरणीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चेहराही तितकाच महत्त्वाचा आहे, अशी भूमिका त्यांच्या सार्वजनिक मांडणीतून दिसून येते. नगर परिषदेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या परळी शहरातील अपूर्ण इमारती पूर्णत्वास नेऊन कार्यान्वित करण्याची त्यांची धडपड डॉ. भालचंद्र सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याच्या निमित्ताने दिसून आली. वाचन संस्कृतीला बळकटी आणि एक ज्ञानमंदिर कार्यान्वित व्हावे हा ध्यास त्यांनी नगराध्यक्ष पद स्वीकारल्यापासूनच घेतला होता. परळीच्या धार्मिक आणि ऐतिहासिक ओळखीचा वारसा जपत आधुनिक नागरी सुविधांची उभारणी करणे, स्वच्छता आणि पर्यावरणाला प्राधान्य देणे, डिजिटल सुविधांना चालना देणे आणि नागरिकांचा प्रशासनातील सहभाग वाढवणे, हा त्यांच्या विकासदृष्टीचा केंद्रबिंदू राहिला आहे. पर्यावरणीय संरक्षणाचेही महत्त्व राखत त्यांनी उपलब्ध पाणी वितरण व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला. अगोदरच शहरात विंधन विहिरींमुळे चाळणी झालेल्या भूभागाची आणखी चाळणी होऊ नये यासाठी पाणी वितरण व्यवस्थेला बळकटी देत एकही विंधन विहीर नगर परिषदेला घेण्याची गरज भासू नये याची काटेकोर उपाय योजना केली. त्याचबरोबर दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता खंबीर भूमिका घेत वाण प्रकल्पातील एक एक थेंब पाणी वाचविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा त्यांनी आग्रह धरला. यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून प्रशासनाला आपल्या खंबीर भूमिकेने पाणीसाठा वाचविणे व संरक्षित करण्यासाठी भाग पाडले. नगराध्यक्षपदाची खरी कसोटी कार्यालयातील निर्णयांपेक्षा नागरिकांच्या प्रश्नांपर्यंत पोहोचण्यात असते. त्यामुळे नागरिक, व्यापारी, महिला, युवक, नगरसेवक, अधिकारी आणि विविध सामाजिक घटक यांच्याशी संवाद ठेवणे ही त्यांच्या कार्यशैलीतील महत्त्वाची बाब ठरत आहे.नगरपरिषद ही केवळ कर वसुली किंवा नागरी सुविधा देणारी संस्था न राहता नागरिकांच्या अपेक्षांना प्रतिसाद देणारी लोकाभिमुख संस्था व्हावी, हा दृष्टिकोन त्यांच्या भूमिकेतून सातत्याने पुढे येतो.

        सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी यांच्या सार्वजनिक जीवनातील जनसंपर्क, सातत्याने जनतेत मिसळणे , सुसंस्कृत व सुसंवाद या जमेच्या बाजू ठरल्या आहेत. आज परळीच्या विकासाचे त्यांचे मोठे स्वप्न व प्रमाणिक प्रयत्न आहेत.शहराचे सर्वांगीण विकासात्मक नियोजन यासह प्रत्येक क्षेत्रात त्यांच्याकडून अपेक्षा मोठ्या आहेत. या अपेक्षांना विकासकामांची जोड देत, संवेदनशीलता, संवाद आणि प्रशासकीय शिस्त या त्रिसूत्रीच्या माध्यमातून परळीच्या विकासाला नवी दिशा देण्याची जबाबदारी त्यांच्यासमोर आहे.ती जबाबदारी तळमळीने पार पाडण्यासाठी अविरत मेहनत घेतांना दिसत आहेत. यासाठी लक्षावधींचे आशिर्वाद त्यांच्या पाठिशी आहेत.त्यांच्या या प्रयत्नांना सुयश लाभो आणि परळीसाठी त्यांचे नेतृत्व एक सकारात्मक, सुसंस्कृत आणि सुसंवादी ठरो हीच प्रभू वैद्यनाथ चरणी प्रार्थना. वाढदिवसानिमित्त सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

त्यांच्या पुढील सार्वजनिक वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश लाभो, हीच सदिच्छा.

  ✍️- प्रा. रविंद्र जोशी (पत्रकार, परळी वैजनाथ.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!