श्वान नियंत्रणासाठी नगर परिषदेकडून नागरिकांना आवाहन

मोकाट श्वान नियंत्रणासाठी नगर परिषदेमार्फत सातत्यपूर्ण उपाययोजना ;नागरीकांनीही सक्रिय सहकार्य करावे - मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे

श्वान नियंत्रणासाठी नगर परिषदेकडून नागरिकांना आवाहन

परळी वैजनाथ : प्रतिनिधी....

          शहरातील वाढत्या मोकाट श्वानांच्या संख्येची नगर परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली असून, गेल्या अनेक दिवसांपासून श्वान नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू आहेत. प्राणी जन्मनियंत्रण (ABC) कार्यक्रमांतर्गत मोकाट श्वान पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याची कार्यवाही केली जात आहे. नगर परिषदेच्या एबीसी सेंटरमध्ये मोकाट श्वानांसाठी उपलब्ध असलेले सर्व पिंजरे सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे अधिक श्वानांना ताब्यात घेता यावे यासाठी नवीन पिंजरे तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. उपलब्ध क्षमता वाढवून नियोजनबद्ध पद्धतीने श्वान नियंत्रणाची मोहीम राबविण्यात येत असल्याचे नगर परिषद मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.

            शहरातील काही भागांत अचानक मोठ्या प्रमाणावर मोकाट श्वान आढळून येत असल्याने त्यामागील कारणांचाही प्रशासनाकडून आढावा घेतला जात आहे. नागरिकांनी अपूर्ण माहिती किंवा अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे. मोकाट श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी केवळ प्रशासनाची कारवाई पुरेशी नसून नागरिकांचे सहकार्यही आवश्यक आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी श्वानांना अन्न टाकणे टाळावे. पाळीव श्वानांची नगर परिषदेकडे नोंदणी करून त्यांचे निर्बीजीकरण व आवश्यक लसीकरण करून घ्यावे. तसेच पाळीव श्वानांना रस्त्यावर मोकाट सोडू नये. उघड्यावर टाकला जाणारा अन्नकचरा व खाद्यपदार्थ यांची योग्य विल्हेवाट लावणे, आक्रमक श्वान किंवा श्वानांच्या टोळ्यांमुळे नागरिकांना धोका निर्माण झाल्यास नगर परिषदेला तातडीने माहिती देणे आणि श्वान पकडण्यासाठी येणाऱ्या पथकाला सहकार्य करणे, या बाबीमध्ये नागरिकांकडून सक्रिय सहकार्य अपेक्षित आहे. मोकाट श्वानांचा प्रश्न एका दिवसात सुटणारा नसून त्यासाठी सातत्यपूर्ण नियोजन, प्रशासनाची प्रभावी कार्यवाही आणि नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. 

          प्राणी जन्म नियंत्रण नियम, २०२३ शासन निर्णय, दिनांक २०.०३.२०२५ अन्वये सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू करण्यात आले आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निर्देश तसेच नगर विकास विभाग, शासन परिपत्रक दि.२४ नोव्हेंबर, २०२५ अन्वये तसेच, आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांचे दि. १८ नोव्हेंबर, २०२५ रोजीचे पत्र व दि.१६ फेब्रुवारी, २०२६ रोजीचे परिपत्रक यान्वये राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेले निर्देश आणि  मा. सर्वोच्च न्यायालयाने दि.१९ मे, २०२६ रोजी दिलेल्या अंतरिम निर्णयाच्या अनुषंगाने तसेच  भारतीय जिव जंतू कल्याण मंडळ (Animal Welfare Board of India) यांनी दि. २७/११/२०२५ रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे (SOPs) पालन करुन  प्राणी जन्म नियंत्रण (Animal Birth Control) नियम, २०२३ मधील नियम ११ (१९) नियमानुसार नगर परिषदेमार्फत ही नियंत्रण मोहीम राबवावी लागते.यासाठी सर्वांच्या सहभागातून या समस्येवर समुळ उपाययोजना होऊ शकते. शहरातील भटक्या श्वानांचा उपद्रव कमी करण्यासाठी  नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषदेमार्फत मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!