उकाडा, डास आणि अंधारात नागरिकांचा अक्षरशः छळ...
महावितरणचा बेशिस्त कारभार; नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच!
मनाला येईल तेव्हा वीज गायब; उकाडा, डास आणि अंधारात नागरिकांचा अक्षरशः छळ
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
परळी शहरात गेल्या चार दिवसांपासून मनाला येईल तेव्हा वीजपुरवठा खंडित होत असल्याने महावितरणचा भोंगळ, ढिसाळ आणि बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वीज गुल झाल्यानंतर संपूर्ण रात्र नागरिकांनी उकाडा, डासांचा त्रास आणि असह्य घुसमटीत काढावी ललागत आहे. या छळवणुकीने संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हा प्रकार थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याची भावना व्यक्त होत आहे.
एका बाजूला प्रचंड उष्णता आणि दुसऱ्या बाजूला डासांचा वाढता त्रास यामुळे लहान मुले, वृद्ध, महिला आणि आजारी व्यक्तींची अक्षरशः परवड झाली. वीज नसल्याने पंखे, कुलर आणि इतर आवश्यक साधने बंद पडली. रात्रभर झोप लागत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकांचे फोन उचलले गेले नाहीत. नागरिकांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. ज्यांना काही उत्तरे देण्यात आली ती थातुरमातूर देण्यात आली.लोडशेडिंग सुरु केली का? असा सवाल विचारणाऱ्या नागरिकांना हो लोडशेडिंग अचानकच सुरु होत असते अशी बेजबाबदार उत्तरे देण्यात आली
त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कोट्यवधी रुपयांची देखभाल व दुरुस्ती झाल्याचे दावे केले जातात. मात्र सातत्याने वीजपुरवठा कोलमडत असेल, तर ही देखभाल नेमकी कागदावर झाली की प्रत्यक्षात, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.महावितरणमधील काही मुजोर अधिकारी आणि बेशिस्त कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील लोकप्रतिनिधी आणि पुढारी मात्र या गंभीर प्रश्नावर शांत बसत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. "पुढारी शांत... नागरिक हतबल..." अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संतप्त नागरिकांनी महावितरण प्रशासनाला इशारा देत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा जनआक्रोश रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही देण्यात येत आहे.
संतप्त नागरिकांचे सवाल...
• चार चार तास वीज जाते, मग अखंडित वीज देता कधी?
• देखभाल-दुरुस्तीची कामे नेमकी कुठे झाली?
• नागरिकांचे फोन का उचलले जात नाहीत?
• रात्रीच्या आपत्कालीन परिस्थितीत जबाबदार अधिकारी कुठे असतात?
• नागरिकांच्या हालअपेष्टांची जबाबदारी कोण घेणार?
"महावितरण जागे होणार की नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणार?" हा प्रश्न आता परळीकर विचारत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा