रुग्णवाहिकांच्या मार्गातील अडथळा दूर करण्याच्याही दिल्या सूचना*
बीड शहरातील रस्त्याचे काम संथ गतीने ; ना. पंकजा मुंडेंनी घेतला समाचार
काम जलदगतीने पूर्ण करण्याचे नॅशनल हायवे च्या अधिकाऱ्यांना निर्देश
बीड दि. ०४ --- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका या अडीच किलोमीटरच्या सिमेंट रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने होत असल्याच्या कारणावरून राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज नॅशनल हाय वे च्या अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. हे काम जलदगतीने पूर्ण करावे असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच रुग्णवाहिकांच्या मार्गातील अडथळा दूर करण्याच्याही सूचनाही त्यांनी दिल्या
शहरातील महत्वाकांक्षी सिमेट रस्त्याच्या कामा संदर्भात स्थानिक वर्तमानपत्रात आलेल्या बातमीची दखल घेत ना. पंकजाताई मुंडे यांनी नॅशनल हाय वे कार्यकारी अभियंता उबाळे यांना संपर्क साधून याविषयी जाब विचारला. कोणत्याही परिस्थितीत हे काम जलदगतीने झाले पाहिजे असं त्यांनी निःक्षून सांगितलं.
रूग्णवाहिकेचा अडथळा दूर करा
--------
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका या बार्शी रोडवरील राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे आणि नालीचे काम सध्या सुरू आहे. हे काम चालू असताना रस्त्याच्या मधोमध एकसलग दुभाजक बसवण्यात आले आहे. वास्तविक पाहता, यापूर्वी जिल्हा रुग्णालयासमोर दुभाजक नव्हते, ज्यामुळे बार्शी रोडवरून येणाऱ्या रुग्णवाहिका आणि इतर वाहने थेट रुग्णालयात प्रवेश करू शकत होती. रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून पूर्वीप्रमाणेच केवळ रुग्णवाहिका आणि रुग्णालयात येणाऱ्या वाहनांसाठी येथे प्रवेशाची व्यवस्था असावी, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. गंभीर रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकांना अर्धा ते एक किलोमीटरचा फेरा मारून रुग्णालयात पोहोचावे लागत होते. याची दखल घेऊन ना. पंकजाताई मुंडे यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधला आणि रुग्णांच्या हितासाठी तातडीने दुभाजक हटवून रुग्णवाहिकांना थेट प्रवेश उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
••••

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा