शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका...
विहिरीत थेंब नाही अन् ट्रान्सफॉर्मरची घोषणा!; ॲड. जीवन देशमुखांचा सरकारवर घणाघात
पाणी असताना वीज दिली नाही; आता पाणीच नाही. थातुरमातूर घोषणांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका
परळी वैजनाथ : प्रतिनिधी
दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याला नवीन ट्रान्सफॉर्मर व विद्युत सुविधांसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याच्या शासनाच्या घोषणेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी शहराध्यक्ष ॲड. जीवनराव देशमुख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विहिरी कोरड्या पडल्या असताना ट्रान्सफॉर्मरच्या घोषणा करून शेतकऱ्यांना नेमका कोणता दिलासा मिळणार?, असा सवाल त्यांनी केला.
दुष्काळामुळे अनेक विहिरींमध्ये पाणीसाठा शिल्लक नाही. तलावांमधून होणारा अनधिकृत पाणीउपसाही प्रशासनाने रोखला आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणीच उपलब्ध नसताना विद्युत सुविधांसाठी निधी जाहीर करणे ही वस्तुस्थितीपासून दूर असलेली घोषणा आहे, अशी टीका देशमुख यांनी केली.
‘पाणी असताना शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळाली नाही आणि आता पाणीच नाही. अशा वेळी ट्रान्सफॉर्मर देऊन काय साध्य होणार?’ असा सवाल करत त्यांनी सरकारच्या दुष्काळ उपाययोजनांवर नाराजी व्यक्त केली. प्रसिद्धीसाठी घोषणा करण्यापेक्षा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळेल, अशा उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
दुष्काळामुळे गावागावांतील रोजगाराचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे छावण्यांसह गावपातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आणि जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. दुष्काळग्रस्तांच्या मूलभूत गरजा भागविणे ही शासनाची प्राथमिकता असली पाहिजे, असे देशमुख यांनी म्हटले.
केवळ बातम्यांमध्ये झळकण्यासाठी घोषणा करण्याऐवजी दुष्काळग्रस्तांच्या प्रत्यक्ष अडचणी सोडविण्यासाठी ठोस आणि तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
“सध्या विहिरीला पाणी नाही, तलावातील पाणीउपसाही शासनाने बंद केला आहे. अशा परिस्थितीत ट्रान्सफॉर्मरच्या घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. छावण्यांमध्ये आणि गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात; केवळ बातमीसाठी घोषणा करणे योग्य नाही.”
— ॲड. जीवनराव देशमुख

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा