माजी सैनिकाला दगड-विटांनी मारहाण; लिकर कार्डासाठी धमकी
केज : माजी सैनिकांच्या कॅन्टीनमधून सवलतीच्या दरात मिळणाऱ्या मद्याच्या खरेदीसाठी वापरले जाणारे लिकर कार्ड देण्याच्या मागणीवरून एका माजी सैनिकाला दगड आणि विटांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना केज तालुक्यातील होळ येथे घडली. या प्रकरणी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
होळ येथील श्रीमंत दशरथ शिंदे (६१) हे माजी सैनिक आहेत. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ते शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी नेताजी व्यंकटराव लोमटे हा हातात कोयते घेऊन तेथे आला. त्याने शिंदे यांच्याकडे मिलिटरी कॅन्टीनचे लिकर कार्ड मागितले. मात्र, आपण हे कार्ड वापरत नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यानंतर लोमटे याने शिंदे यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली. तसेच दगड आणि विटांनी त्यांच्या पाठीत व डोक्यात मारहाण केली. लाथाबुक्क्यांनीही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शिंदे यांच्या तक्रारीवरून नेताजी लोमटे याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गु.र.नं. २६६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ११५(२), ११८(१), ११८(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सय्यद अमजद तपास करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा