अंबाजोगाई पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचे शाळांना निर्देश...
सर्वत्र लागू करावा असा स्तुत्य निर्णय: विद्यार्थ्यांना व्हॉट्सॲपवरून गृहपाठ देऊ नका !
अंबाजोगाई पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचे शाळांना निर्देश
अंबाजोगाई : प्रतिनिधी
शालेय विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यासाठी पालकांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप अथवा अन्य ऑनलाइन माध्यमांचा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश अंबाजोगाई पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तालुक्यातील शाळांना दिले आहेत. विद्यार्थ्यांचा मोबाईलचा अतिवापर वाढून त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा अतिशय स्तुत्य निर्णय या गटशिक्षणाधिकाऱ्यांना घेतला असून सर्वत्र हा निर्णय लागू करावा असा अनुकरणीय व स्तुत्य निर्णय असल्याच्या प्रतिक्रिया पालकांतून व्यक्त होत आहेत.
यासंदर्भात अंबाजोगाई पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एम. एस. सुवर्णकार यांनी २५ सप्टेंबर २०२६ रोजी काढलेले पत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. या पत्रात तालुक्यातील जिल्हा परिषद, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित तसेच स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत.पत्रात नमूद केल्यानुसार, काही शाळांमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना वर्गात नियमित गृहपाठ न देता पालकांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून गृहपाठ दिला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा मोबाईलवरील वापर वाढत असून, मोबाईलच्या अतिवापरामुळे त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.त्यामुळे विद्यार्थी अथवा पालकांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप किंवा ऑनलाइन माध्यमातून गृहपाठ देऊ नये, अशा स्पष्ट सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना गृहपाठ देताना शालेय स्तरावर योग्य ती पारंपरिक पद्धत अवलंबावी, असेही या निर्देशातून स्पष्ट करण्यात आले आहे. नगर परिषद अंबाजोगाईचे सदस्य महेश बालासाहेब लोमटे यांनी यासंदर्भात ४ सप्टेंबर २०२६ रोजी निवेदन दिले होते. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सर्व संबंधित शाळांना या सूचना देण्यात आल्या आहेत.
मोबाईलच्या वाढत्या वापरावर नियंत्रण
ऑनलाइन शिक्षणाच्या काळात मोबाईलचा वापर शैक्षणिक गरज म्हणून वाढला असला, तरी गृहपाठासाठी सातत्याने मोबाईलवर अवलंबून राहिल्याने विद्यार्थ्यांच्या स्क्रीन टाइममध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि आरोग्य लक्षात घेऊन प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेकडे पालकांचेही लक्ष लागले आहे.हा अतिशय स्तुत्य निर्णय या गटशिक्षणाधिकाऱ्यांना घेतला असून सर्वत्र हा निर्णय लागू करावा असा अनुकरणीय व स्तुत्य निर्णय असल्याच्या प्रतिक्रिया पालकांतून व्यक्त होत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा