दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खडका डॅमची पाईपलाईन शहराच्या पाणी पुरवठ्यास जोडा - माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख

परळी वैजनाथ : प्रतिनिधी....

            परळी शहराच्या संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी खडका डॅम येथून थर्मल पॉवर स्टेशनकडे आलेली पाणीपुरवठा पाईपलाईन परळी शहराच्या विद्यमान पाणीपुरवठा योजनेस जोडून पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष दिपक  देशमुख यांनी केली आहे.

    परळी शहराला सध्या नागापूर येथील वाण धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सद्यस्थितीत वाण धरणातील पाणीसाठा अत्यल्प असल्याने भविष्यात शहराच्या पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आतापासूनच पर्यायी जलस्रोतांचा विचार करणे आवश्यक असल्याचे देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे. खडका बंधार्‍यातून परळी येथील विज निर्मिती केंद्रापर्यंत पाणी आणण्याची सोय आहे. 2015 साली पडलेल्या दुष्काळात विज निर्मिती केंद्रातील अधिकारी व कर्मचार्‍यांना नागापूर येथील वाण धरणातून पिण्याचे पाणी पुरविण्यात आले होते. त्यामुळे धरणापासून विज निर्मिती केंद्रातील पाणी साठवण हौदापर्यंत पाईप लाईन आहे. केवळ काही वेळात व शुल्लक खर्चात खडका बंधार्‍याचे पाणी परळीच्या पाणी पुरवठा करणार्‍या पाईप लाईनला जोडता येऊ शकते. ही पाईप लाईन जोडल्यास परळी शहराला दररोज पाणी पुरवठा केला जाऊ शकतो.खडका डॅम येथून थर्मल पॉवर स्टेशनकडे आलेली पाणीपुरवठा पाईपलाईन शहराच्या विद्यमान पाणीपुरवठा योजनेच्या परिसरात उपलब्ध असल्याने, तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्यास आवश्यक जोडणी करून तिचा पर्यायी जलस्रोत म्हणून उपयोग करता येऊ शकतो. याबाबत संबंधित अधिकारी व तांत्रिक यंत्रणेमार्फत पाईपलाईनची तातडीने पाहणी करून तांत्रिक व्यवहार्यता तपासावी आणि  आवश्यक जोडणीचे काम हाती घ्यावे. भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेता या प्रस्तावावर प्राधान्याने कार्यवाही करावी, अशी मागणी दीपक देशमुख यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!