इंदपवाडीच्या विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव घेतला आनंदनगरीतून!
परळी दि. 26 (प्रतिनिधी)
चटकदार, मटकदार, खमंग पदार्थांचा आस्वाद घेत इंदपवाडी येथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत आज आनंदनगरी मध्ये सहभाग घेतला!
शाळेचे प्रांगण म्हणजे जणू आज एखादे बाजाराचे ठिकाण वाटत होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी येथे आज आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले. गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री गोविंद मुंडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री केशव मुंडे, माजी सरपंच श्री मोहन मुंडे, माजी सरपंच श्री भागवत मुंडे, शालेय शिक्षण समिती सदस्य श्री वैजनाथ मुंडे यांच्यासह श्री रामकृष्ण मुंडे व शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष केंद्रे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि श्रीफळ वाढवून आनंदनगरीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
उपस्थित सर्व अतिथींचे व ग्रामस्थांचे स्वागत केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने तयार केलेल्या पौष्टिक, खमंग पदार्थांना विक्रीची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांना हा पदार्थ तयार करत असताना कोण कोणत्या वस्तू किती वजनाच्या प्रमाणात आणि किमतीच्या वापरल्या गेल्या याचा हिशोब करून आपल्या वस्तूची किंमत ठरवण्याचा फॉर्म शाळेच्या वतीने देण्यात आलेला होता. सर्व विक्री झाल्यानंतर, लागलेला खर्च, विक्रीनंतर मिळालेली रक्कम आणि झालेला नफा दुकानदारांनी म्हणजेच विद्यार्थ्यांनी शाळेकडे सादर करणे आवश्यक करण्यात आली होते.
आनंद नगरीत दुकान उभारलेल्या विद्यार्थ्यांची व्यवहार करत असताना पालकांनी मुद्दामहून गणितीय क्रिया अनुभवातून मिळाव्यात यासाठी त्यांच्याशी संवाद करण्याची सूचना ही शिक्षकांकडून करण्यात आलेली होती.
या आनंदनगरीचे कल्पक आमंत्रण संपूर्ण गावाला स्वतःच्या गाडीवर बसून लाऊडस्पीकर वरून आवाहन करत शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री केशव मुंडे यांनी सकाळीच गावकऱ्यांना दिले.
आनंद नगरी सुरू झाल्यानंतर अगदी दोन तासाच्या आत सर्व दुकानातील साहित्य संपले होते! गावकऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांनी तसेच इंदपवाडीतून इतर गावात उच्च शिक्षणासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांनीही या आनंदनगरीचा आस्वाद घेतला.
आनंदनगरी यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री जगदीश चौधरी, चंद्रप्रकाश लोखंडे, श्रीमती संध्याताई नागरगोजे, श्री चंद्रशेखर फुटके, श्री विष्णू ढाकणे, श्री दीपक खंदारे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा