परळीत ७ लाख ७२ हजारांच्या चोरीच्या तारांसह पिकअप जप्त; दोघांवर गुन्हा दाखल



परळी (प्रतिनिधी):
परळी ते नंदागौळ रस्त्यावर चोरीचे भंगार घेऊन जाणाऱ्या एका पिकअपवर परळी ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ३ लाख ७२ हजार रुपये किमतीची १,२४० किलो ॲल्युमिनियमची (जर्मन) तार आणि ४ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन, असा एकूण ७ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमकी घटना काय?
दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास परळी ग्रामीण पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, परळी ते नंदागौळ रस्त्याने एका पिकअपमधून (क्रमांक MH 44 U 4139) चोरीचे भंगार नेले जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वसंतनगर तांडा फाट्यावर सापळा लावून सदर वाहन अडवले.
वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात ॲल्युमिनियमच्या तारा आढळून आल्या. वाहन चालक याच्याकडे चौकशी केली असता, त्याने हे भंगार मोईन अकबर काकर (रा. काकर मोहल्ला, परळी) यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले.
पावत्या नसल्याने भांडे फुटले
भंगार मालक मोईन काकर याला पोलिसांनी पाचारण करून तारांच्या खरेदी-विक्रीच्या पावत्या मागितल्या, मात्र तो कोणत्याही वैध कागदपत्रे सादर करू शकला नाही. अधिक चौकशीत त्याने कबूल केले की, या तारा रशिद उर्फ मांग्या शेख (रा. इस्लामपुरा, बीड) याने २३ फेब्रुवारी रोजी त्याला आणून दिल्या होत्या. या तारा चोरीच्या असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी दोन पंचांसमक्ष जप्तीचा पंचनामा केला.
गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलीस अंमलदार महादेव बबन केदार यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोईन अकबर काकर आणि रशिद उर्फ मांग्या शेख यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३१७(२) आणि भारतीय विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३६ नुसार परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश निमोणे करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...