परळीकरांच्या वतीने शोभायात्रा काढत मंगलमय स्वागत...
जातीवाचक शिवीगाळ व छळाला कंटाळून मजुराची आत्महत्या; एकावर गुन्हा दाखल
परळी वैजनाथ,पुढारी वृत्तसेवा –
पैशाच्या कारणावरून वारंवार जातीय शिवीगाळ व दमदाटी सहन करावी लागल्याने नैराश्यात जाऊन एका मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यातील पौळ पिंपरी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत कुंडलीक पिराजी वैराळ (रा. पौळ पिंपरी, ता. परळी वैजनाथ) यांनी दि. 20 मार्च 2026 रोजी रात्री 11 वा. ते दि. 21 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान आरोपी राम महादेव पौळ यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेप्रकरणी मयताची पत्नी शांताबाई कुंडलीक वैराळ (वय 55, व्यवसाय मजुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राम महादेव पौळ (रा. पौळ पिंपरी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 108, 352 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपी हा पैशाच्या वादातून वारंवार जातीय शिवीगाळ करून दमदाटी करत होता. या सततच्या मानसिक छळाला कंटाळून व नैराश्यात जाऊन कुंडलीक वैराळ यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची नोंद दि. 22 मार्च रोजी करण्यात आली असून, पुढील तपास माजलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा