संभाजीनगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल; मुलींचा शोध सुरू..

खळबळजनक : परळीत दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुली बेपत्ता; पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

संभाजीनगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल; मुलींचा शोध सुरू

परळी वैजनाथ, प्रतिनिधी :

    परळी शहरातून गेल्या दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून मुलींचा शोध घेतला जात आहे.

         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील एका १६ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली आहे. या प्रकरणी १३ ऑक्टोबर रोजी गुन्हा क्रमांक २४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत, गणेशपार भागातील गोंडेगल्ली परिसरातील एका १६ वर्षे ६ महिन्यांच्या मुलीला १३ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक २४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि गौड करीत आहेत.

    तिसऱ्या घटनेत गणेशपार भागातील देशपांडे गल्ली परिसरातील १२ वर्षीय मुलीला १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.२० वा. सुमारास अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक २५०/२०२६ कलम १३७ (२) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि गौड करीत आहेत..

दोन दिवसांत तीन मुली बेपत्ता; मुलींच्या पालकांत चिंता

----------------------------

     दरम्यान, शहरातून दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने खळबळ माजली आहे. अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे पालकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. पोलिसांनी या प्रकरणांचा गांभीर्याने तपास करून मुलींचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही या घटनांमुळे ऐरणीवर आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!