प्रवाशी ऑटोंच्या माध्यमातून चोरट्यांची टोळी सक्रिय

लेकीच्या गावाला निघालेल्या आजीला ऑटोत बसवून भलतीकडेच नेलं अन् रिक्षाचालक व एका महिलेने मिळून लुटले


प्रवाशी ऑटोंच्या माध्यमातून चोरट्यांची टोळी सक्रिय

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – परळी तालुक्यातीलच मिरवट या गावाहून आपल्या लेकीच्या नेकोटवाडी या गावाला जाण्यासाठी निघालेल्या एका आजीबाईला प्रवासी ऑटोच्या पॉइंट वर असलेल्या एका ऑटो चालकांने दिशाभूल करत ऑटोत बसवूनभरतीकडेच नेले. अंबलवाडी घाटात निर्जनस्थळी नेऊन ऑटो रिक्षा चालक व एका महिलेने मिळून या वृद्धेच्या अंगावरील दागिने धमकावून, बळजबरीने काढून घेतले. त्याच ठिकाणी त्या आजींना सोडून ऑटोचालक व त्याची सहकारी महिला निघून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने प्रवासी ऑटो च्या माध्यमातून प्रवाशांना लुटणारी टोळी सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाढत्या चोऱ्या हे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
         "चला बसा ,नैकोटावाडीला सोडतो…” या गोड बोलण्यावर विश्वास ठेवणे एका महिलेला महागात पडले. अज्ञात ऑटोचालक आणि त्याच्या साथीदार महिलेने घाटरस्त्यावर नेऊन तिची जबरदस्तीने लूट केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बायनाबाई माणिक पवार वय ६५ वर्षे रा.मिरवट ता.परळी वैजनाथ या आपल्या मुलीला भेटण्यासाठी गावातून नैकोटावाडी येथे जाण्यासाठी परळीला आल्या. परळी वैजनाथ बस स्थानकाबाहेर वेगवेगळ्या गावांना जाणाऱ्या प्रवाशी ऑटोंचा पाॅईन्ट आहे. याठिकाणी ऑटोची  चौकशी करीत असतांना  एका अज्ञात ऑटोचालकाने “चला,तुम्हाला नैकोटावाडीला सोडतो” असे सांगत तिला आपल्या रिक्षात बसवले. विश्वासाने रिक्षात बसलेल्या महिलेची हीच चूक ठरली. ऑटोचालकाने नेहमीच्या मार्गाऐवजी अंबाजोगाई रोडने घाटाच्या दिशेने वळसा घेत अंबलवाडी रोडकडे गाडी वळवली. निर्जन ठिकाणी पोहोचताच त्याने व रिक्षात आधीपासून बसलेल्या एका महिलेने मिळून फिर्यादीला धमकावत तिच्या हातातील चांदीचे पाटल्या-काकणे (अंदाजे ४० भार, किंमत सुमारे ₹३०,०००) जबरदस्तीने काढून घेतले. इतकेच नव्हे, तर सोबत असलेल्या महिलेने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे ‘सेवन पीस पोत’ व सोन्याचे मणी (एकूण ६ ग्रॅम, किंमत सुमारे ₹६०,०००) हिसकावून घेतले. लूट केल्यानंतर आरोपींनी महिलेला त्याच ठिकाणी सोडून ऑटो घेऊन पळ काढला.
         या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रवाशी ऑटोच्या माध्यमातून प्रवाशांना टार्गेट करणारी लुटमार करणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता  व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान शहराच्या सर्व रस्त्यांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलीस करत असून बस स्थानका समोरील ऑटो पॉईंट वरूनच या महिलेला बसवण्यात आल्याने ऑटो चालक व हा ऑटो तसेच संपूर्ण घटनाक्रम या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. त्यामुळे लवकरच दिशाभूल करून वृद्ध महिलेची लूट करणारा आरोपी व ऑटो पोलीस ताब्यात घेतील व घटनेचा उलगडा होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!