अत्यंत मनमिळावू आणि सामाजिक संवेदनशील व्यक्तिमत्व हरवले....
परळीतील भाजप नेते, पत्रकार किरण धोंड यांच्या सुविद्य पत्नी सौ.कीर्ती धोंड यांचे निधन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
येथील भारतीय जनता पार्टीचे नेते तथा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शहराध्यक्ष किरण धोंड यांच्या सुविद्य पत्नी सौ. कीर्ती किरण धोंड (वय ४२) यांचे आज, गुरुवार दि. ५ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने धोंड परिवारासह स्नेही, आप्तेष्ट, मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.
सौ. कीर्ती किरण धोंड यांनी अंगणवाडी शिक्षिका म्हणून परळीत काम केले. विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. अत्यंत मनमिळावू, कुटुंबवत्सल आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्व म्हणून त्या सर्वपरिचित होत्या.सौ. कीर्ती धोंड यांनी अंगणवाडी शिक्षिका म्हणून सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या पश्चात पती, सासू आणि एक मुलगा असा परिवार आहे.
स्वतः च्या आजारपणातही जपले होते सामाजिक भान
सौ. कीर्ती धोंड या केवळ अंगणवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत नव्हत्या, तर त्यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला होता. २०२३ मध्ये त्यांनी शासकीय कर्करोग रुग्णालयातील राबवलेल्या उपक्रमाची आठवण प्रकर्षाने होत आहे.सामान्यतः अधिक महिन्यात लेक-जावयांना घरी बोलावून 'धोंडे जेवण' देण्याची प्रथा असताना, त्यांनी या प्रथेला एक विधायक वळण दिले होते. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शासकीय कर्करोग रुग्णालयातील रुग्णांना त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन धोंडे जेवण दिले होते. एवढेच नाही तर नातेवाईकां प्रमाणेच रुग्णांना 'आहेर' भेट देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला होता. स्वतः वर उपचार सुरू असतानाही त्यांच्या या सामाजिक भानाच्या या उपक्रमाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. गायकवाड व कर्मचाऱ्यांनी मोठे कौतुक केले होते.
अत्यंत मनमिळावू आणि सामाजिक संवेदनशील असलेल्या सौ. कीर्ती धोंड यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोकसंवेदना व्यक्त होत आहे. धोंड परिवारावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा