विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?
आष्टीत ‘धूम स्टाईल’ सोनसाखळी चोरांचा पर्दाफाश; दोन सख्खे मेहुणे जेरबंद
महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून दुचाकीवरून पसार होणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर आष्टी पोलिसांची धडक कारवाई
कडा | प्रतिनिधी....
आष्टी शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी व दागिने धूम स्टाईलने हिसकावून दुचाकीवरून पसार होणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा आष्टी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन सख्ख्या मेहुण्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या चौकशीत दोन मोठ्या गुन्ह्यांची कबुली मिळाल्याने आणखी चोरीच्या घटनांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आष्टी परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये, विशेषतः महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.पोलिसांना खुले आव्हान देणाऱ्या या चोरट्यांचा माग काढण्यासाठी तीन विशेष पथके तयार करण्यात आली होती.शनिवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून विकास गड्या भोसले (वय २२,रा.चिखली,ता.आष्टी, जि. बीड) आणि अरुण बप्पा काळे (वय २२, रा. बोलेगाव,ता. गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर) या दोन आरोपींना अटक केली.
पोलिस चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी अरुण काळे हा गंगापूरहून दुचाकीवर थेट आष्टीत येत असे. येथे त्याचा सख्खा मेहुणा विकास भोसले याला सोबत घेऊन दोघेही शहरात फिरत एकट्या महिलांना टार्गेट करत. संधी मिळताच गळ्यातील सोनसाखळी किंवा दागिने हिसकावून आरोपी तात्काळ पसार होत असत.या चोऱ्यांमागे मौजमजा आणि दारूच्या नशेचा खर्च भागवण्याचा उद्देश असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.
पोलिसांनी खाकी दाखवताच आरोपींनी आष्टी परिसरातील दोन गंभीर गुन्ह्यांची कबुली दिली. आष्टी-रुटी-खानापूर रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावणे तसेच आष्टी शहरातील आणखी एका महिलेची लूट केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. बीड आणि संभाजीनगर जिल्ह्यातील इतर गुन्ह्यांचे धागेदोरेही या तपासातून समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे, पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, LCB चे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर तसेच संयुक्त पोलिस पथकाने केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा