चार राज्यांतून भाविकांची हजेरी...१६ जूनपर्यंत चालणार धार्मिक सोहळा
श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज 'लघु आळंदी' येवती येथे अधिक मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम; हजारो भाविकांनी घेतला पुरणपोळी महाप्रसादाचा आस्वाद!
महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातून भाविकांची अलोट गर्दी
अमोल जोशी / अधिकमास विशेष.....
मुखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र व 'लघु आळंदी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवती येथील श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान येथे अधिक महिन्याचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त गुरुवारी आयोजित महाप्रसादात सुमारे हजारो भाविकांनी तूप-पुरणपोळीचा आस्वाद घेतला. महाराजांच्या दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी मठात भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती.
येवती येथील या पवित्र संस्थानात श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज यांची जागृत संजीवन समाधी आहे. अधिक महिन्यानिमित्त मठाधिपती श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज यांच्या पावन उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली रोज विविध धार्मिक विधी पार पडत आहेत. यामध्ये संजीवन समाधीला महाभिषेक, महापूजा, नियमित गुरुउपदेश, महाआरती व महा नैवेद्य यांसह अखंड अन्नदान सुरू आहे.
चार राज्यांतून भाविकांची हजेरी
हा भव्य धार्मिक उत्सव १७ मे ते १६ जून या कालावधीत चालणार असून, यामध्ये गुरुमंत्र आणि गुरुउपदेशाचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. गुरुवारी झालेल्या विशेष महाआरती आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. संपूर्ण परिसर ' श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराजांच्या' जयघोषाने आणि भक्तीरसाने न्हाऊन निघाला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा